आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंद्रूप, औरादचे काँग्रेस उमेदवार गायब, कार्यकर्त्यांची परीक्षा; भाजप समर्थकांची निवडणूक प्रचारात आघाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर- मंद्रूप व औराद गणातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब शेळके व इंदुमती अलगोंडा प्रचाराच्या रणधुमाळी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गायब झालेत. तर भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही गणात काँग्रेस नेत्यांच्या प्रतिष्ठेची आणि दोन्ही पॅनलच्या समर्थक कार्यकर्त्यांची परीक्षा पाहणारी लढत पाहायला मिळत आहे. 


काँग्रेसच्या सर्वपक्षीय सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने मंद्रूप गणाची इंदुमती अलगोंडा यांना उमेदवारी दिली. वडील भीमराव पाटील वडकबाळकर यांच्यानंतर बाजार समितीचा कारभार सभापती म्हणून अलगोंडा यांनी पाहिला. अनुभव व आर्थिक बळ लक्षात घेत त्यांना उमेदवारी मिळाली. माजी सभापती गोपाळराव कोरे यांच्या स्नुषा विद्युल्लता कोरे इच्छुक होत्या. पण कोरे घराण्याला उमेदवारी मिळाली नाही. कारण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, अर्जुन टेळे व प्रवीण देशपांडे हे किती मनापासून कोरेंना साथ देतील, याची शंका नेत्यांना होती. गेल्या वेळेस प्रवीण देशपांडे व पिरप्पा म्हेत्रे यांच्या रूपाने मंद्रूपला बाजार समितीचे दोन संचालकपद मिळाले. पण यावेळेस या पॅनेलने मंद्रूपला उमेदवारी दिली नाही. 


या उलट एकेकाळी काँग्रेसचे देशपांडे यांच्या फडात तयार झालेल्या माजी सरपंच सूर्यकांत ख्याडे यांच्या पत्नी सुनंदा ख्याडे यांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपची उमेदवारी दिली. मंद्रूपसारख्या मोठ्या गावाला व आपल्या मामाला उमेदवारी मिळवून देत भाजपचे मळसिद्ध मुगळे यांनी बाजी मारली. कारण पत्नीला सरपंचपद न मिळाल्याने ख्याडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मुगळे यांना साथ दिली होती. 


सध्या प्रचारात भाजपच्या ख्याडे आघाडी घेत मतदारांच्या गाठीभेटी घेत वाड्या-वस्त्या पिंजून काढत आहेत. तर काँग्रेस अलगोंडा उमेदवारी जाहीर होताच एक दिवस नेत्यांच्या घरोघरी भेट दिल्या. नंतर जामीन फेटाळल्यानंतर अटकेच्या भीतीने भूमिगत झाल्या. म्हेत्रे यांचा मुलगा व देशपांडे हेही फरार असल्याने अलगोंडा कधीपासून प्रचार सुरू करतात असा प्रश्न त्यांचे समर्थकच विचारत आहेत. एकूणच मंद्रूप गणात अलगोंडा विरुद्ध ख्याडे यांच्यातच खरी लढत आहे. मंद्रूपचा स्थानिक उमेदवार विरुद्ध उपरा उमेदवार असा प्रचार भाजपने सुरू केला आहे. 


मंद्रूप गणात काँग्रेस महाआघाडीच्या इंदुमती अलगोंडा विरुद्ध भाजपच्या सुनंदा ख्याडे यांच्यासह शालन चव्हाण, विजयालक्ष्मी बिराजदार, रत्नाबाई पुजारी हे ही नशीब आजमावत आहेत. 


कुडलचे केरके यांच्या रूपाने नवा चेहरा भाजपने दिला आहे. त्यामुळे शेळके यांचे वर्चस्व असलेल्या या गणात धनगर विरुद्ध लिंगायत समाज असे जातीय राजकारण फिरताना दिसत आहे. तेव्हा जिल्ह्याचे राजकारण पाहिलेले मातब्बर उमेदवार शेळके यांना एकेकाळी त्यांच्याच फडातील बरूरपासून जवळच असलेल्या कुडलचा भाजपचा नवखा उमेदवार केरके यांनी आव्हान दिले आहे. या लढतीत केरके चमत्कार घडवणार की, शेळकेंना केलेल्या कामाची पोच त्यांचे समर्थक देणार पाहावे लागेल. औराद गणात काँग्रेस महाआघाडीचे बाळासाहेब शेळके विरुद्ध भाजपचे संगाप्पा केरके या प्रमुख उमेदवारासह विजय गायकवाड, शिवशरण वाले, नागय्या स्वामी रिंगणात आहेत. 


शेळकेंची भिस्त कार्यकर्त्यांवर 
औराद गणात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके विरुद्ध भाजपचे नवखे उमेदवार संगाप्पा केरके यांच्यातच खरी लढत होत आहे. माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्यामुळे शेळके राजकारणात आले. या भागात त्यांचे काम आहे. पण त्यांच्यावरही गुन्हा दाखल असल्याने ते फरार आहेत. उमेदवार निश्चित होईपर्यंत गणात त्यांचा संपर्क होता. पण प्रचार अंतिम टप्प्यात असताना त्यांचा पत्ता नाही. 'मी अनेकांची कामे केली आहेत. त्यामुळे जामीन मिळो अथवा न मिळो' असे म्हणून कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून ते निश्चिंत आहेत. याउलट सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केरके यांच्या प्रचारार्थ माळकवठे, औज, कुरघोटला दौरा केला. 

बातम्या आणखी आहेत...