आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरला प्रश्न : नेते की शेतकऱ्यांची पोरं? रविवारी मतदान, मंगळवारी मोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून नेते विरुद्ध कार्यकर्ते असा रंगलेला बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी थंडावला. ही निवडणूक माजी आमदार दिलीप माने यांच्या अस्तित्वाची तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही गटांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील सर्व गावांसह वाडी-वस्ती नेते व उमेदवारांनी पिंजून काढले तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रत्येक गावातील मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 


गेल्या १० दिवसात निवडणूक रिंगणातील दोन मंत्री, दोन आमदार, महापौर, पाच माजी आमदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आटापिटा केला. सहकारमंत्री देशमुख यांनी सहकार कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांना मतदानाची संधी दिल्याने शेतकरी मतदार पुन्हा त्याच नेत्यांना संधी देणार की नव्याने नशिब आजमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना संधी देणार, याची उत्सुकता निकालानंतरच शमणार आहे. 


शुक्रवारी उमेदवारांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. सकाळी आठ वाजल्यापासून दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, दिलीप माने यांनी सकाळी नान्नज तर सायंकाळी मंद्रूप येथे सभा घेतली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या जाहीर सभा मंद्रूप, भंडारकवठे, औराद आणि नान्नज येथे झाल्या. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने गणातील दोन्ही पॅनलचे उमेदवार आणि कार्यकर्ते गणात तळ ठोकून होते. रविवारी मतदान असल्याने सर्व उमेदवार शेवटच्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त दिसून आले. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धावपळ दिसून येत आहे. अनेक मतदार परगावी असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक मतदारांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केल्याचे दिसून आले. 


बाजार समितीसाठी प्रमुख लढती 
पालकमंत्री देशमुख X शिरीष पाटील 
दिलीप माने X श्रीमंत बंडगर 
सिद्रामप्पा पाटील X सिद्धाराम हेले X श्रीशैल नरोळे 
इंदुमती अलगोंडा X सुनंदा ख्याडे 
सुरेश हसापुरे X आप्पासाहेब पाटील 
प्रकाश चोरेकर X इंद्रजित पवार 
प्रकाश वानकर X सुनील गुंड 


श्री सिद्धरामेश्वर परिवर्तन पॅनल : शिवदारे, हसापुरेंच्या मागणीनुसारच अपहाराची चौकशी, आज तेच उलटले 
- गेली ५० वर्षे सत्तेवर आहेत, पण त्यांनी शेतकरी विकास न करता स्वत:ची मालमत्ता समजून कारभार केला. आता पुन्हा शेतकऱ्यांच्या विकासासाठी संधी देण्याची मागणी करीत आहेत. 
- शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देऊन प्रथमच बाजार समितीसाठी संचालक निवडण्याची संधी दिली. 


श्री सिद्धेश्वर विकास पॅनल: जिंकता यावे यासाठी कायद्यात दुरुस्ती, सहकारमंत्री करताहेत सुडाचे राजकारण 
- बाजार समिती निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठीच सहकारमंत्री यांनी सुडाचे राजकारण केले. चौकशी करणे, गुन्हे दाखल करणे व अटक करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांवर दबाव आणला. 
- बाजार समितीच्या ब्रह्मदेवदादा माने बँकेतील ठेवी मुदतपूर्वीच काढल्याने बाजार समितीला ४ कोटींचे नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...