आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आघाडीला पालकमंत्र्यांचे बळ, पणनमंत्र्यांचे परिवर्तनाचे प्रयत्न निष्फळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शेतकऱ्यांना बाजार समितीसाठी मतदानाचा अधिकार दिला, या मुद्यावर पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मोठ्या आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे गेले तर काँग्रेस महाआघाडीने पालकमंत्र्यांच्या मदतीने पणनमंत्री देशमुखांनी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सुडाचे राजकारण केल्याचा प्रचार केला. या मुद्यावर चर्चेत राहिलेल्या निवडणुकीत शेतकरी मतदारांनी पणनमंत्री यांच्यावर अविश्वास दाखवून काँग्रेस उमेदवारांच्या हाती बाजार समितीच्या कारभाराची चावी दिली. पालकमंत्री विजय देशमुख यांनी कुंभारी गणातून सहकारमंत्री विरोधात दंड थोपटल्याने काँग्रेसला आयती संधी मिळाली. कंदलगाव गणातून मुळचे काँग्रेसचे अप्पासाहेब पाटील हे हसापुरे यांच्या विरोधात लढले. बाजार समितीच्या निकालामुळे दक्षिणच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होऊ शकते. सहकारमंत्री देशमुख यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा सूचक इशारा आहे. 


सोलापूर बाजार समितीचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. बाजार समितीच्या निवडणूक प्रचारामध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार हा मुद्दा शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला. सुडाचे राजकारण, भ्रष्टाचार, आरक्षित जागेवर घराचे बांधकाम, लोकमंगलची उसाची बिले याच मुद्यावर प्रचार राहिला. शेतकऱ्यांचे मतदान असलेली पहिलीच निवडणूक असल्याने अनेक शेतकऱ्यांच्यापर्यंत उमेदवार पोहचू शकले नाहीत. यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी दोन्ही पॅनलकडून मोठ्या प्रमाणात धनशक्तीचाही वापर करण्यात आल्याची निकालाच्या ठिकाणी चर्चा होती. पालकमंत्री व दिलीप माने यांच्या राजकीय डावपेचापुढे सहकारमंत्री देशमुख यांचे डावपेच अपुरे पडल्यानेच सिद्धरामेश्वर पॅनलच्या उमेदवारांचा टिकाव लागला नाही. 


काल, आज आणि उद्या...
दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी दिलीप माने, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे व गणेश वानकर यांचा पराभव करीत आमदारकी मिळविली. बाजार समिती निवडणुकीत दिलीप माने यांनी पालकमंत्री देशमुख व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या संमतीने सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधली. गुन्हे दाखल असूनही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना जोरदार टक्कर देत १५ पैकी १३ जागा एकहाती मिळविल्या. पण दीड वर्षानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हीच ताकद एकत्र राहिल्यास निकालावेळी वेगळे चित्र पहायला मिळणार आहे. एका अर्थाने विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीमच झाली. 


सोरेगाव कॅम्प
कृषी उत्पन्न बाजार समितीची मंगळवारी मतमोजणी झाली. त्यावेळी ब्रम्हदेवदादा माने बँकेच्या कॅम्प शाखेसमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. 


बाजार समिती सभापतीपदाचे दावेदार... 
पालकमंत्री विजयकुमार देशमुख, दिलीप माने, बाळासाहेब शेळके, विजया भोसले यांची नावे सभापती पदासाठी चर्चेत आहेत. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूून लिंगायत समाजाला खुश करण्यासाठी व पुढील कारवाई टाळण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना बाजार समितीच्या सभापती पदाची संधी दिली जाऊ शकते. शिवाय दक्षिण तालुक्यातील धनगर समाजाची मते घेण्यासाठी बाळासाहेब शेळके यांनाही संधी मिळू शकते. बाजार समिती पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी दिलीप माने सभापतिपद स्वत:कडे किंवा संचालकांचा विरोध झाल्यास विजया भोसले यांना एकवेळ संधी मिळू शकण्याची शक्यता आहे. उपसभापती पदासाठी उत्तर तालुक्यातील जितेंद्र साठे यांच्यासह दक्षिणमधील श्रीशैल नरोळे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. 


१८ पैकी १४ नवीन चेहरे... 
शेतकरी गणातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, श्रीशैल नरोळे, विजया भोसले, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, प्रकाश वानकर, नामदेव गवळी, राजकुमार वाघमारे, अमर पाटील, वसंत पाटील, आप्पासाहेब पाटील, रामप्पा चिवडशेट्टी हे १२ संचालक प्रथमच बाजार समितीमध्ये संचालक म्हणून जाणार आहेत. व्यापारी गणातून बसवराज इटकळे तर हमाल तोलार गणातून शिवानंद पुजारी यांना प्रथमच संचालकपदाची संधी मिळाली आहे. नव्या संचालक मंडळात पाटील आडनावाच्या चौघांचा समावेश आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...