आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती: संचालक न्यायालयात गैरहजर, मात्र जामीन वाढवण्याचा अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणात १७ जणांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर अाहे. यातील नऊ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. जी. हेजीब यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
सर्व संचालकांना न्यायालयात हजर राहण्याचा अादेश असताना कुणीही अाले नाहीत. त्यानंतर वकिलांनी अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज दाखल केला. त्याला सरकारी वकिलांनी विरोध केला. यावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्यता अाहे. कार्यकर्त्यांची न्यायालय परिसरात गर्दी झाली होती.

 

दिलीप माने, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंडा पाटील यांच्यासह १७ जणांना अंतरिम जामीन तर नऊ जणांना अजून अटकपूर्व जामीन मिळाला नाही. या सगळ्यांना जामीन मिळावा म्हणून वकिलांनी बुधवारी युक्तिवाद करून लेखी अर्ज दिला. त्यावर सरकारी वकिलांनी हरकत घेतली. संचालक मंडळाकडून अॅड. धनंजय माने, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. भारत कट्टे, अॅड. अभिजित इटकर यांनी काम पाहिले. सरकारतर्फे अॅड. प्रदीपसिंग रजपूत यांनी बाजू मांडली.

 

मतमोजणीचा होणार सराव, त्यात वेळेचा अंदाज घेणार
मतांच्या चिठ्ठ्या मोजण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज घेण्यासाठी मतमोजणीचा सराव करण्यात येणार आहे. तसेच त्यावरून मतमोजणीसाठी लागणाऱ्या वेळेचा, कर्मचाऱ्यांच्या संख्येचाही अंदाज घेतला जाणार आहे. त्यानुसार मतमोजणीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी अमोल कदम यांनी सांगितले.
सोलापूर बाजार समितीसाठी १ जुलै रोजी मतदान तर ३ जुलैला मतमोजणी होणार आहे. एकूण २२६ मतदान केंद्र आहेत. एका केंद्रावर किमान पाच कर्मचारी असतील, याशिवाय एका गणातील मतदान केंद्रावर एक झोनल अधिकारी नियुक्त करण्यात येईल. मंडलाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्राच्या सुस्थितीचा आढावा घेण्यात आला.

 

सोरेगाव कॅम्पमध्ये मतमोजणी : मतमोजणी सोरेगाव येथील एसआरपी कॅम्प येथे करण्यात येणार आहे. मोजणीच्या पाच दिवस आधी सभागृह ताब्यात घेऊन मतदानाची तयारीही त्याचठिकाणी करण्यात येईल. रामवाडी गोदाम आकाराने लहान असल्याने एसआरपी कॅम्पच्या सभागृहाचा प्रस्ताव प्राधिकरणाला सादर केला आहे.

 

दिलीप माने यांच्यासह ११ अपिलांवर आज निर्णय
बाजार समिती निवडणुकीतील माजी सभापती दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह ११ जणांच्या अपील अर्जावर गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे गुरुवारी दुपारी तीन वाजता निर्णय घेणार आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे जिल्हाधिकारी उमेदवारी अर्जावर काय निर्णय घेणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. बार्शी बाजार समितीच्या १६ अपिलांवर सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

 

शर्तभंगवरही सुनावणी : शर्तभंग प्रकरणामध्ये सोसायटी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी सकाळी ११ वाजता बोलावली आहे. शासनाने शर्तभंग प्रकरण नियमानुकूल करण्याचे आदेश दिले होते. संस्थेच्या सभासदांनी प्रतिसाद न दिल्याने जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलावली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...