आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - व्यापाऱ्यांनी साखळीद्वारे साखरेचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन महिन्यात कोणतेही कारण नसताना पाचशे रुपयांनी भाव पडले आहे. काही कारखानदार व साखरेच्या व्यापाऱ्यांची साखळी कार्यरत आहे. दुबळ्या, आजारी कारखान्यांची कमी दरामध्ये साखर खरेदीची प्रवृत्ती वाढली आहे. त्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी गेल्या दोन महिन्यांनी ज्यांनी साखर विकली व खरेदी केली त्यांची चौकशी केल्यास वस्तुस्थिती समोर येईल. त्या प्रकरणाची सखोल चाैकशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी सांगितले.
शेतकरी आक्रोश मेळाव्यानिमित्त शुक्रवारी (दि.१६) खासदार शेट्टी सोलापुरात आले होते. अब्दुलपूरकर मंगल कार्यालयातील मेळाव्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. साखर कारखान्यांनी विकलेल्या साखरेचे भाव पडत आहेत. पण, किरकोळ विक्रीचे दर स्थिर आहेत. कमी झालेल्या साखर दराचा फायदा उत्पादक व ग्राहकांना झाला नसून पैसे खाणाऱ्या बांडगुळांना झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी साखळी करून साखरेचे भाव कमी-जास्त करणाऱ्यांच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाने साखरेचा खप वाढवा या उद्देशाने साखरसाठेवरील मर्यादा उठविली. पण, त्याचा गैरफायदा काही व्यापाऱ्यांनी घेतला. आजारी व दुबळ्या कारखान्यांना साखर विकण्यास प्रवृत्त केले. काही सक्षम कारखान्यांनी साखर कायम ठेवली आहे. साखर विकणारे अन् खरेदी करणाऱ्यांची चौकशी करा. व्यापाऱ्यांनी साखर बाजारात आणली की फक्त साठा केला, ते नक्की समोर येईल. गैरप्रकाराच्या मुळाशी जाईपर्यंत स्वस्थ बसणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.
सर्व पक्षांशी समान अंतरावर आहे
स्वाभिमानी शेतकरी संघटना फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करते.'एनडीए'ने शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याने आम्ही त्यांच्यापासून दूर गेलो. पण, आम्ही विरोधी गटातही सहभागी झालो नाहीत. सध्या आम्ही सर्वच पक्षांपासून समान अंतरावर आहोत. विरोधी पक्षात जाण्याचा प्रसंग आल्यास त्यांना आमच्याही काही अटी असतील. त्या वेळोवेळी स्पष्ट करू.
दोन विधेयकांसाठी मदत करणाऱ्यांना आम्ही मदत करू
देशभरातील १९१ शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित करून नोव्हेंबरमध्ये किसान मुक्ती संसद आयोजिली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठीचे दोन विधेयक तयार केले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी स्वरूपात ते विधेयक मांडणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे. स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव घेण्याचा अधिकार देणे, या दोन विधेयकांना सभागृहात पाठिंबा देणाऱ्या व त्यास मंजुरीसाठी आश्वासन देणाऱ्यांच्या सोबत जाण्याचा विचार करू, असे शेट्टी म्हणाले.
'लोकमंगल'विषयी तक्रार नाही
सहकारमंत्री देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढले. त्याप्रकरणी शेतकरी संघटनेने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, याप्रश्नावर बोलताना शेट्टी म्हणाले, आमच्याकडे कुणी तक्रारच केली नाही. परस्पर कर्ज भरल्यानंतर गप्प बसले. ठोस तक्रारदारांच्या सोबत स्वाभिमानी संघटना कायम साथ देईल, असे शेट्टी यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.