आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार मृतांवर आज अंत्यसंस्कार, मंगळवेढा बंदची सर्वपक्षीय हाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- धुळे येथे झालेल्या हल्ल्यात मृत पावलेल्या मंगळवेढा येथील चार व कर्नाटकातील एका व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत देऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू, मृतांच्या कुटुंबीयांना जागा, घर आणि नातेवाईकांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू. अंत्यसंस्कार शांततेत पार पाडावेत, असे आश्वासन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिले. 


नाथपंथी डवरी समाजाच्या खवे आणि मानेवाडी येथील चार भिक्षुकांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य व समाजाच्या सांत्वनासाठी सोमवारी मंगळवेढा येथे आले होते. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी मोबाइलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मदत जाहीर केली. 


तत्पूर्वी समाजाच्या वतीने 'आमचा समाज भिक्षा मागून जगणारा आहे. या समाजावर प्रथमच असा अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी शासनाने घोषणा करावी. तेव्हाच मृतांवर अंत्यसंस्कार केले जातील, अशी भूमिका पीडित कुटुंबातील सदस्यांनी व डवरी समाजाच्या वतीने निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले होते. 


यावेळी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, डवरी समाजाचे नेते मच्छिंद्र भोसले, आरपीआयचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, अशोक माळी, गौरीशंकर बुरकुल, औदुंबर वाडदेकर, शुभांगी सूर्यवंशी उपस्थित होते. 


दरम्यान, सोमवारी सकाळी आमदार भारत भालके यांच्या संपर्क कार्यालयात समाजाच्या असंख्य नागरिकांनी आमदार भालके यांच्याशी चर्चा केली. ओळखपत्र असतानादेखील याचा विचार न करता त्यांची हत्या केली. या प्रकरणात धुळे पोलिस प्रमुखांशी बोललो असून, यातील काही आरोपींना अटक केली अाहे. आणखी आरोपींचा शोध चालूच असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी वारसांना मदत व नोकरीचे आशवासन सरकारने दिल्याशिवाय अंत्यविधी होऊ देणार नाही. उद्याच्या अधिवेशनात शासनाने ठोस भूमिका जाहीर केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे यांनी सांगितले होते. 


मंगळवेढ्यात आज शोकसभेचे आयोजन 
चौघांच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी सर्व पक्षीय मंगळवेढा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी बारा वाजता मारुतीच्या पटांगणात श्रद्धांजली, शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मृतांचे शव घेऊन शववाहिका धुळ्यातून निघाली आहे. मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित राहणार आहेत. 


बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्याची मागणी 
पंढरपूर |
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा आठवडी बाजारात मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवेने मंगळवेढा तालुक्यातील चार व इंडी तालुक्यातील एका व्यक्तीचा जमावाने भीषण मारहाण करून त्यांची हत्या केली. या हत्येमध्ये बळी पडलेल्या पाचही व्यक्ती या अत्यंत गरीब कुटुंबातील व पोटासाठी गावोगावी भटकणाऱ्या व्यक्ती होत्या. पोटाची खळगी भरण्यासाठी ते काही ठिकाणी भिक्षा मागून तर काही ठिकाणी ज्योतिष सांगून मिळणाऱ्या अन्नावर उपजीविका करत होत्या. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधीतून या पाचही कुटुंबीयांना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी पंढरपूर शहर भाजपने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. 


राइनपाडा घटनेच्या निषेधासाठी धरणे 
मोहोळ |
मंगळवेढा तालुक्यातील नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या भिक्षा मागून पोटाची खळगी भरणाऱ्या लोकांवर धुळेे जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारे व कलंक लावणारे कृत्य करून त्या निष्पाप लोकांना दगड, लोखंडी खुर्च्या आणि अन्य वस्तूंनी डोक्यावर गंभीर मारहाण करून त्यांना जीवे ठार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची शासकीय मदत मिळावी व सदरची केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संबंधितांना फाशीची शिक्षा व्हावी आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार आर.बी. दुलंगे यांना मोहोळ तालुका नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने देण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष रमेश बारसकर, शीलवंत क्षीरसागर, पिंटू शेगर, भीमराव तांबवे, भाऊराव शिंदे, दत्तात्रय तांबवे, रमेश तांबवे, मोहन चव्हाण, शामराव बाबर, राहुल शेगर, शिवाजी चव्हाण, प्रकाश साळुंखे, सुभाष इंगोले आदींसह समाजबांधव उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...