आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलच्या कर्मचाऱ्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न; अवैध वाळूचा ट्रॅक्टर नेत असल्याचा राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला- अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे आणताना ट्रॅक्टर मालकासह तिघांनी तीन महसूल कर्मचाऱ्यांना पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर घेऊन पोबारा केला. गुरुवारी (दि. ५) सायंकाळी सातच्या सुमारास सोनंद परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने संशयितांना सोमवारपर्यंत (दि. ९) पोलिस कोठडी दिली. नितीन अरुण पाटील, दादा रामचंद्र बागल, संभाजी दादा काशीद (सर्व रा. सोनंद) अशी त्यांची नावे आहेत. 


मंडल अधिकारी दत्तात्रय मल्लिकार्जुन कांबळे यांनी फिर्याद दिली. तहसीलदार संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मंडल अधिकारी कांबळे यांच्यासह काही तलाठी सोनंद भागात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेले होते. काशीद वस्ती येथे नितीन पाटील यांचा विनाक्रमांकाचा डंपिंग ट्रॉलीचा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना आढळला. महसूल पथक तो पकडून तहसील कार्यालयाकडे आणताना नितीन, त्याचा मामा दादा बागल, मित्र संभाजी काशीद हे तिघे मोटरसायकलवरून तेथे आले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवला. ट्रॅक्टर कसे नेता हे पाहतो. तिकडे बेसुमार वाळू उपसा होताना कारवाई करत नाही. आम्हा गरिबांवर कारवाई करता का, अशी विचारणा करत दमदाटी, शिवीगाळ केली. 


तसेच संभाजी याने जवळच्या बाटलीतील पेट्रोल ट्रॅक्टर व त्यातील कर्मचारी अविनाश नवले, कुमार रवी राजवाडे, हरीश काटकर यांच्या अंगावर ओतले. ट्रॅक्टरसह जाळून टाकीन, अशी धमकी देत पेटवण्याचा प्रयत्न केला. तिघेही तलाठी उडी टाकून ट्रॅक्टरबाहेर पडले. ही संधी साधून आणि अंधाराचा फायदा घेत संशयितांनी ट्रॅक्टर वळवून सोनंदकडे नेले. मंडल अधिकारी कांबळे यांनी दूरध्वनीवरून तहसीलदार पाटील यांना घटनेची माहिती दिली. तहसीलदार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. सोनंद गावात जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने तीनही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील ट्रॅक्टर व मोटारसायकल अद्याप सापडले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...