आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर यात्रा जनावर बाजारात रोज 45 लाखांची उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त विजापूर नाका परिसरातील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात जनावरांचा बाजार फुलला आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यातून जनावरे दाखल झाली आहेत. रोज सुमारे ४५ लाखांची उलाढाल होत आहे. 


सोलापुरातून आंध्र प्रदेश व कर्नाटकात जनावरे न्यायची असल्यास तिथे जनावरांच्या खरेदीची पावती मागितली जाते. मंदिर समिती जनावरांच्या खरेदी - विक्रीचे व्यवहार झाल्यावर देणगीची पावती संबंधितास देते. आतापर्यंत अशा ३०० हून अधिक पावत्या झाल्या अाहेत. दिवसाकाठी ६० ते ७० जनावरांची विक्री झाल्याचे दिसते. एक म्हैस किमान ५० ते ७० हजारांत विकली जाते. जाफराबादी म्हशीचे दर लाख रुपयांच्या पुढे आहेत. यावरून दिवसाकाठी ४२ ते ४५ लाख रुपयांची उलाढाल जनावर बाजारात होत असल्याची माहिती जनावर बाजार समितीचे अध्यक्ष काशीनाथ दर्गोपाटील यांनी दिली. 


कर्नाटक व अांध्र प्रदेशात मोठे डेअरी फार्म असून तिथे येथून म्हशी नेल्या जातात. व्यवहार झाल्यावर संबंधित व्यक्ती स्वखुषीने २०० ते ५०० रुपयांची पावती मंदिर समिती जनावर बाजार कार्यालयात करते. यंदा सोलापूर जिल्ह्यातील, अकलूज, मोहोळ, माढा, मंगळवेढा तसेच कर्नाटक येथूनही मोठ्या प्रमाणावर म्हशी व वळू आलेले आहेत. हा बाजार १२ तारखेला सुरू झाला असून १८ तारखेपर्यंत चालेल. काल आणि परवा एकाच दिवसात २०० म्हशींचे व्यवहार झाले. अल्पदरात भोजन व्यवस्था मंदिर समितीकडून परगावहून आलेल्या शेतकऱ्यांसाठी व खरेदीदारांसाठी स्वस्त भाजी भाकरी योजना या जनावर बाजार परिसरात करण्यात आली आहे. ५ रुपयामध्ये दोन भाकरी, एक भाजी, भात, आमटी असे भोजन देण्यात येत आहे. दररोज दीड ते दोन हजार जण याचा लाभ घेतात. पूर्वी भोजन दोन रुपयात देत होते. 

बातम्या आणखी आहेत...