आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची कामे वेगात: वाकाव ते वडशिंगे दुहेरीकरणाने जोडले, अद्ययावत सिग्नल सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वाकाव -माढा-वडशिंगे स्थानकावर १ एप्रिलपासून रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होते. रविवारी या तिन्ही स्थानकाला दुहेरीकरणाने जोडण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू असलेले काम सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरूच होते. वाकाव व माढा स्थानकावर असलेली सिग्नलिंग यंत्रणा बदलून त्या ठिकाणी नवी अद्ययावत सिग्नलिंग यंत्रणा सुरू करण्यात आली. वडशिंगे स्थानकावर सोमवारी नवी सिग्नलिंग यंत्रणा बसवली जाणार आहे. दुहेरीकरणाचे काम संपले असले तरीही अन्य छोट्या-मोठ्या कामांसाठी १५ एप्रिलपर्यंत ब्लॉक राहणार आहे. 


वाकाव ते वडशिंगेदरम्यान १६ किमी अंतरावर झालेल्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर त्यांना स्थानकाशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे काम होते. १ एप्रिलपासून या कामास सुरुवात झाली. या कामातील शेवटचा टप्पा रविवारी पार पडला. नॉन इंटरलॉकिंग काम करतानाच टर्न आऊटबरोबरच सिग्नलिंग यंत्रणा उभारण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवी इलेक्ट्रॉनिक इंटरलाॅकिंग ही यंत्रणा उभारण्यात आली. यामुळे सिग्नल फेल्युअर होण्याचा धोका कमी आहे. 


सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले 
उद्यान एक्स्प्रेस व सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे रेक इंटिग्रेशन असल्याने दोन्ही गाड्यांच्या प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे. सध्या सोलापूर विभागात रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने उद्यान एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला. रेक इंटिग्रेशनमुळे उद्यान एक्स्प्रेसला उशीर झाल्यानंतर सिद्धेश्वर एक्स्प्रेस उशिराने धावत आहे. तर सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुंबईला उशिराने पाेहाेचत असल्याने उद्यानला निघण्यास उशीर होत आहे. परिणामी दोन्ही गाड्यांच्या प्रवाशांना फटका बसत आहे. रविवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सोलापूरला पोहोचणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस सायंकाळी सातच्या सुमारास पोहोचली. 


चेन्नईतील रेल्वे कारखान्यात डबे निर्मितीचा विक्रम 
चेन्नई येथील रेल्वेच्या आयसीएफ कोच फॅक्टरीत मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक म्हणजे तब्बल २५०३ डब्यांची विक्रमी निर्मिती करण्यात आली. एका वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात डबे निर्मिती करण्याची ही घटना मानण्यात येत आहे. विक्रमी डबे निर्मिती करणाऱ्या या कारखान्यात आतापर्यंत जवळपास ५५ हजार डब्यांचे उत्पादन झाले असून यासाठी १० हजार ७०० कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते. 


देशात तीन प्रमुख ठिकाणी रेल्वे डब्यांचे उत्पादन होते. यात चेन्नई येथे आयसीएफ, कपुरथळा येथे आरसीएफ व रायबरेली येथे एमसीएफ डब्यांचे उत्पादन केले जाते. मागील वर्षी आयसीएफ येथे २२७७ डब्यांचे उत्पादन केले होते. चेन्नई येथे तयार होणाऱ्या डब्यामध्ये प्रामुख्याने ईएमयू, डेमू प्रकारचे डबे तयार केले गेले. ईएमयूचे डबे मुंबई व चेन्नई येथील लोकलसाठी वापरण्यात आले. तर डेमूचे डबे जम्मू- काश्मीर येथे वापरण्यात आले. या शिवाय अपघाताच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणारी स्पार्ट रेल्वेचे डबेदेखील येथेच तयार करण्यात आले. आयआरसीटीसीच्या मागणीनुसार पर्यटनाला प्राेत्साहन देणारी विस्टाडोम डबे देखिल येथेच तयार करण्यात आले. आतापर्यंत जवळपास १११५ एलएचबी डबे तयार करण्यात आले. येणाऱ्या आर्थिक वर्षात या ठिकाणी ३ हजार डबे तयार करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. 


उत्कृष्ट कार्याबद्दल सोलापूर विभागाला ५ शिल्ड, नागपूर येथे होणार वितरण 
उत्कृष्ट कार्याबद्दल सोलापूर रेल्वे विभागाला पाच शिल्ड जाहीर झाले आहे. येत्या १२ एप्रिलला नागपूर येथे रेल पुरस्कार सोहळा येथे वितरण केले जाणार आहे. या वेळी मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी. के. शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. सोलापूर विभागातील यांत्रिक, सिग्नल आणि दूरसंचार, हॉस्पिटल, विद्युत आदी विभागांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना शिल्ड देऊन गौरव केला जाणार आहे. १६ एप्रिल १८५३ रोजी देशात पहिली रेल्वे धावली. दरवर्षी रेल्वे प्रशासन याचे औचित्य साधून रेल सप्ताहाचे आयोजन करते. १० ते १२ एप्रिलदरम्यान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. हे प्रदर्शन नागपूर स्थानकावरील फलाट ८ वर आयोजित करण्यात आल्याचे उदासी यांनी सांगितले. 


योग्य नियोजनामुळे शक्य 
योग्य नियोजन व कुशल कर्मचाऱ्यांमुळे हे शक्य झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ३ हजार डबे निर्मितीचा मानस आहे.
- एस माणी, सरव्यवस्थापक, आयसीएफ, चेन्नई. 

बातम्या आणखी आहेत...