आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे वारीतील दिंड्यांचा होणार सन्मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे पारंपरिक प्रथेबरोबर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे. त्यासाठी मंदिर समितीकडून पालखी सोहळ्यातील दिंडीच्या पाहणी व निकषांची पूर्तता होतात की नाही यासाठी समिती दिंड्यांची पाहणी करत आहे. सुरुवातीला सात नामवंत पालख्यांना पुरस्कारासाठी निवडले आहे. त्यानुसार समितीने त्याची पाहणी केली आहे. 


विठ्ठल मंदिर समितीतर्फे यंदा प्रथमच निर्मल वारी पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचे वितरण २३ जुलै रोजी विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यंदा प्रायोगिक स्वरूपात सात दिंड्यांची निवड केली आहे. यात निवृत्ती, नामदेव, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ व तुकाराम महाराजांच्या दिंड्यांचा समावेश आहे. त्यानुसार त्याची पाहणी केली आहे. 


मंदिर समितीच्या निकषानुसार ज्या दिंड्या निवडल्या जातील त्यांना बक्षीस व प्रशिस्तपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाईल. प्रथम येणाऱ्यास पहिले बक्षीस एक लाख, दुसरे ७५ हजार तर तृतीय बक्षीस ५० हजार असेल. मंदिर समिती पहिल्यांदाच पालख्या प्रस्थानवेळी भेट देत आहेत. मुक्ताई नगर, त्र्यंबकेश्वर, पैठण, देहू, आळंदी व सासवड आदी ठिकाणी भेट दिली. दिंड्या तपासणी समितीत अॅड. माधवी निगडे, सचिन पुणेकर, सूर्यकांत भिसे, शिवाजी मोरे महाराज आदींचा समावेशा आहे. 


पुरस्काराचे निकष : 
दिंडी नोंदणीकृत असावी, दिंडीतील सहभागी होणाऱ्यांचा पेहराव वारकरी परंपरेनुसार असावा, भजन वारकरी परंपरेनुसार असावे, पताका व ध्वज काऊने रंगविलेला असावा, दिंडीमध्ये पर्यावरणपूरक व प्लास्टिक वापरू नये, पालखीचा मुक्काम झाल्यावर स्वच्छता ठेवावी, वायू व ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, दिंडीतील वाहन व चालक परवानाधारक असावा, वारकऱ्यांनी शौचालयाचा वापर करावा, दिंडीतील स्त्री व पुरुष संख्या सारखी असावी. 


प्रायोगिक स्वरूपात सात दिंड्याचा समावेश 
पंढरपूरच्या आषाढी वारीत संपूर्ण राज्यभरातून सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची शक्ती मोठी आहे. त्याचे सामाजिक कामात परिवर्तन केले पाहिजे. व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, संस्कार शिबिर, सामुदायिक सोहळा, वृक्षसंवर्धन वर काही दिंड्या काम करीत आहेत. सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान व्हावा असा ठराव मंदिर समितीपुढे मांडला. त्यानुसार श्री विठ्ठल निर्मल वारी पुरस्कार दिला जाईल. त्यासाठी निकष तयार केले. त्यानुसार पुरस्कार दिला जाईल. प्रायोगिक स्वरूपात सात दिंड्यांचा समावेश केला. त्यांची पाहणी केली. भविष्यात सर्व दिंड्या सहभागी करण्याचा मानस आहे. 
- शिवाजी मोरे महाराज, अध्यक्ष, पुरस्कार निवड समिती

बातम्या आणखी आहेत...