आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबांना मानपत्र दिले जाते, ओवेसींना का नाही? सोलापूर मनपात MIMचा सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून फेटाळून लावण्यात आला आहे.


त्यावरून सत्ताधारी भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांत शुक्रवारी चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापूर शहराच्या हिताचे काम करावे, मग त्यांना मानपत्र देऊ, असे भाजपने म्हटल्याने एमआयएमच्या नगरसेवकांचा तिळपापड झाला.
सोलापूर शहरासाठी काहीच काम किंवा योगदान न देणाऱ्या योगगुरू रामदेवबाबा यांना  काही दिवसांपूर्वी पालिकेने मानपत्र बहाल केले होते. मग आता ओवेसींना का नाकारले जात आहे, असे म्हणत एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले.  दरम्यान, ओवसींची महाराष्ट्र व सोलापुरात कामगिरी दिसून येत नाही. त्यांनी त्यासाठी काम करावे, त्यांच्या नावाचा विचार करू, अशी उपसूचना भाजपने मांडली. त्यावर एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी, अझहर हुंडेकरी, तौफिक शेख यांनी आक्षेप घेत त्यांनी केलेले काम मोजून दाखवले.


योगगुरू रामदेवबाबा यांचे सोलापूरसाठी काय योगदान होते त्यांना मानपत्र देण्यात आले, असा प्रश्न खरादी यांनी या वेळी उपस्थित केला. त्यास शिवसेनेचे नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांनी जोरदार विरोध केला. वंदे मातरम म्हणण्यास ओवेसींचा विरोध का? असा प्रश्न विचारत त्यांनी या वेळी एमआयएमचा इतिहास मांडला. शिवसेनेचा मुस्लिमांना विरोध नाही, पण एमआयएमच्या भूमिकेला विरोध आहे. हिंदुस्थानवर अभिमान बाळगणाऱ्या मुस्लिमांच्या पाठीशी शिवसेना आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, एमआयएमने विषयांतर करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलायला सुरुवात केली. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला.

बातम्या आणखी आहेत...