आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी रानमसले येथील रणरागिणींचा एल्गार, धरले धरणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर - पोलिसांच्या निष्क्रिय कारभारामुळे गावातील अवैध व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करत रानमसले येथील रणरागिणी महिला दिनाच्या दिवशीच गुरुवारी (दि. ८) रस्त्यावर उतरल्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यामुळे तालुक्यातील अवैध व्यवसायांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. महिलांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांना साकडे घालत अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली. तसेच अवैध व्यवसायाविरोधात आवाज उठवणाऱ्या युवकांना पोलिस टार्गेट करत असल्याचा आरोपही महिलांनी केला.

 

रानमसले गावात अवैध दारू, शिंदी विक्री, मटका हे अवैध व्यवसाय जोमात सुरू आहेत. २६ जानेवारी रोजी या महिलांनी आंदोलन केले होते. या दिवशीच्या ग्रामसभेत दारूबंदीबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. कार्यवाहीसाठी ठरवा तालुका पोलिस ठाण्याकडे पाठवण्यात आला. परंतु दीड महिन्यात पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे महिलांनी महिला दिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही पोलिसांना जाग आली नाही. शेवटी महिलांना पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे लागले. पोलिस प्रशासनाने आंदोलन थांबण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिल्या. गुरुवारी सकाळी उपसरपंच सारिका गरड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, पोलिस अवैध व्यवसायाला विरोध करणाऱ्या तरुणांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे ते या आंदोलनापासून दूर राहत असल्याचेही महिलांनी सांगितले.

 

अवैध व्यवसायामुळे गावातील वातवरण बिघडले आहे. दीड महिन्यापासून आम्ही मागणी करत असताना पोलिस प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे महिला दिनाच्या दिवशी आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली.
- कोंडाबाई गरड, ग्रामस्थ, रानमसले


रानमसले येथील महिलांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. कारवाई करण्यासाठी विशेष पथक पाठवले जाईल. भविष्यात अवैध व्यवसाय सुरू होऊ नयेत यासाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात येणार आहे.
- वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...