आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक उच्च रक्तदाब दिन : उच्च रक्तदाब सायलेंट किलर, जागरुकता करण्याची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १७ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळता जातो. आपल्या रक्तवाहिन्यामधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. या आजाराविषयीचे दुष्परिणाम लक्षात घेता या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळला जातो. 


उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात कधी निर्माण होतो हे कळत नसल्याने याला सायलेंट किलर असे संबोधले जाते. सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. 


धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण-तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडतात. हा आजार अन्य गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे या आजाराची वेळीच माहिती करून घेणे आणि तणावमुक्त स्वस्थ जीवनमान आत्मसात करणे अत्यावश्यक बनले आहे. (लेखक हे फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ आहेत) 

 

रक्तदाब म्हणजे काय 
रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहून जाण्यासाठी लागणारा दाब म्हणजे रक्तदाब. आपल्या शरीरात रक्तसंचार करण्यासाठी दबावाची आवश्यकता असते. हा दबाव हृदयाच्या नियमित होणाऱ्या स्पंदनामुळे उपलब्ध होतो. 


उच्च रक्तदाबाची कारणे, लक्षणे व उपाय 
कारणे-
निष्क्रियता, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन, अति मानसिक ताण, आहारात मिठाचे प्रमाण अधिक , आनुवंशिक कारणे, जसे मधुमेह, थॉयराईड, किडनीचे विकार. 

लक्षणे - अंधुक दिसणे, वारंवार चिडचिड होणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे, धाप लागणे, छातीत कळ येणे, वारंवार डोके दुखणे, डोके जड होणे. 

दुष्परिणाम- रेटिनोपैथी (अंधत्व येणे), मूत्रपिंड निकामी होणे, मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे, अर्धांगवायू (लकवा), हृदयविकाराचा झटका. 
सल्ला- नियमित व्यायाम (डॉक्टरच्या सल्ल्याने करणे), ताण-तणाव टाळावे, मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, जीवन शैलीमध्ये बदल करणे, सिगारेट, तंबाखू, मद्यपानाचे व्यसन न करणे, नियमित वैद्यकीय सल्ला घेणे, नियमित ब्लड प्रेशर तपासणे, नियमित ब्लड प्रेशरची औषधे घेणे (डॉक्टरच्या सल्ल्यानुसार), पुरेशी झोप घेणे. 

बातम्या आणखी आहेत...