आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेसाठी आमदार औटी यांना नीलेश लंके यांचे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार विजय औटी आणि नीलेश लंके - Divya Marathi
आमदार विजय औटी आणि नीलेश लंके

नगर- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार विजय औटी यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख नीलेश लंके यांचेच मोठे आव्हान राहणार आहे. त्यादृष्टीने लंके यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार औटी यांच्या एकहाती हुकूमशाहीला कंटाळून तालुकाप्रमुख लंकेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडाचे निशाण फडकवले आहे. आमदार औटी व त्यांचे पुत्र उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांच्याकडून लंके यांना दुजाभावाची वागणूक मिळत आहे. त्यामुळे आमदार औटी व तालुकाप्रमुख लंके यांच्यातील राजकीय दरी वाढत आहे. ही दरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या बैठकांमध्ये दिसून आली. 


आमदार विजय औटी यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी (२७ फेब्रुवारी) पारनेर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार असल्याने आमदार औटी समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 


लंकंेच्या पाठीमागे 'मातोश्री' वरील महत्त्वाचा एक गट उभा आहे. त्यांनीही विधानसभेचे तिकीट मिळवून देण्याचा शब्द लंकेंना दिला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे सध्यातरी कुरघोडीच्या राजकारणाला पारनेरच्या शिवसेनेत उत आला आहे. 


तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा दौरा व शेतकरी मेळाव्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, असा सवाल शिवसैनिकांसह सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकींत तालुकाप्रमुख लंकेंनी आमदार औटी यांची प्रचाराची धुरा सांभाळून आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घातली आहे. 


प्रत्येक गावागावात तालुकाप्रमुख लंके यांचे तरुणांचे असणारे नेटवर्क यामुळे ते तरुणांसह सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे तालुकाप्रमुख लंकेंची विधानसभेच्या तयारीने याचा मोठा फटका आमदार औटी यांना बसणार असल्याने वरिष्ठ पातळीवर लंकेंचे ब॔ंड थंड करण्यासाठी व शिवसेना पक्षामध्ये आपले वजन दाखवण्यासाठी या शेतकरी मेळाव्याला किनार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे शिवसेनेतील आमदार औटी व नीलेश लंके यांच्यातील बंडाळी फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला राष्ट्रवादी व काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेत बंडाळी झाली तर नवल वाटू नये. 


आमदार औटींची राजीनाम्याची धमकी? 
शिवसेनेसह आमदार औटी शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत, तर तालुकाप्रमुख लंकंेनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद निवडणूक असो वा जिल्हा नियोजन मंडळात एक हाती वर्चस्व यामुळे लंकंेची तालुक्यात ताकद वाढली आहे. पक्षाने जर लंकंेना ताकद दिली, तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, अशी धमकी औटी यांनी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना दिली असल्याची माहिती समजली. 


लंकेंना भाजप व दोन्ही काँग्रेसची ऑफर 
शिवसेना तालुकाप्रमुख लंकंेची तालुक्यातील वाढती लोकप्रियता पाहून कार्यकर्त्यांनी विधानसभेची जोरदार तयारी चालू केली आहे. त्यातच राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेससह 'प्रवरे'च्या यंत्रणेने नीलेश लंकंेशी संपर्क करून विधानसभेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील सर्वात जास्त लोकप्रियता लंकेंना मिळाली आहे. त्याची दखल भाजपच्या बंगलोर येथील मीडिया सेंटरनी घेतली आहे. 

बातम्या आणखी आहेत...