आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर- उन्हापासून गारवा मिळावा या उद्देशाने दरवर्षी पाडव्यापासून पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची उटी पूजा केली जाते. आतापर्यंत या उटीची चंदन पावडर हातानेच तयार केली जायची. परंतु, यंदापासून खास यंत्राद्वारे चंदनाची पूड तयार केली जात आहे. चंदन पावडर तयार करण्याचे यंत्र समितीने खास जळगावहून आणले असून त्याद्वारे उटीपूजेसाठी लागणारी चंदनपूड तयार केली जात असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. मृगनक्षत्र निघेपर्यंत दररोज दुपारी मंदिरात विठ्ठल व रुक्मिणी मातेची चंदन उटी पूजा केली जाते.
ढोले यांनी सांगितले की, या चंदन उटी पूजेसाठी दररोज ७५० ग्रॅम चंदनाची आवश्यकता असते. त्यापैकी श्री विठ्ठलाच्या मूर्तीला ५०० ग्रॅम चंदनाचा तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीला अडीचशे ग्रॅम चंदनाचा लेप लावला जातो. आतापर्यंत मंदिर समितीचे कर्मचारी सहाणावर चंदनाचे खोड उगाळून पूजेसाठी लागणारे चंदन तयार करायचे. मात्र, समितीने या यंदापासून पूजेसाठी लागणाऱ्या चंदनाची पूड हायटेक पद्धतीने खास यंत्राद्वारे करण्याची व्यवस्था केली आहे.
जळगावहून ४१ हजार रुपयांमध्ये यासाठी खास यंत्र विकत घेण्यात आले आहे. चंदन खोडाचे तुकडे आत टाकल्यानंतर या यंत्रातून चंदनाची एकसारखी बारीक भुकटी (पूड) तयार होते. या चंदनाच्या भुकटीत पाणी मिसळल्यावर पूजेमध्ये मूर्तीला लावण्याची चंदनाची पेस्ट तयार होते. मंदिरात माणसाद्वारे चंदन उगाळणे आता बंद करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.