आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाशी भांडणाच्या रागातून नगरसेवकाची हत्या; पंढरपूरातील नगरसेवक हत्या प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सुत्रधारासह चौघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. संदीप पवार यांच्या धाकट्या भावाशी झालेल्या भांडणाच्या रागातून त्यांचा खून केल्याप्रकरणी बबलू उर्फ अक्षय सुरवसे, संदीप अधटराव, विकी मोरे यांच्यासह अनोळखी सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


बबलू उर्फ अक्षय (पूर्वी रा. पंढरपूर, हल्ली सांगली) पुंडलिक वनारे, मनोज शिरसेकर, भक्तराज धुमाळ (तिघेही रा.पंढरपूर) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाइक तसेच गावकऱ्यांनी सोमवारी संदीप पवार यांची अंत्ययात्रा थांबवून ठेवल्याने पंढरपुरात काही काळ तणाव वाढला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या अटकेचे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवक संदीप पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


दरम्यान, संदीप पवार यांचे धाकटे बंधू भय्या पवार यांच्याशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पंढरपुरातील बबलू ऊर्फ अक्षय सुरवसे, संदीप अधटराव आणि विकी मोरे यांनी अन्य ६-७ जणांच्या मदतीने संदीप यांची हत्या केली, असा आरोप संदीप पवार यांच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. हत्येसाठी हल्लेखोर येतानाचे आणि हत्या करून परत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झालेले आहे. मृत पवार यांचे बंधू भय्या पवार यांना ते फुटेज दाखवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात येत आहे.  


पंढरपूर नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार (३८) यांची रविवारी दुपारी एका हॉटेलात धारदार शस्त्राने वार करून तसेच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर मारेकऱ्यांनी तब्ब्ल सहा गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास संदीप पवार निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीमध्ये संदीप यांचा मृतदेह ठेवण्यात आलेला होता.  या वेळी शहरातील प्रमुख बाजारपेठेसह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती. 

बातम्या आणखी आहेत...