आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी केली काँग्रेस नेत्यांबरोबर 'हात'मिळवणी; महापालिकेसाठी एकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राजकारणात कोणीही कुणाचा मित्र नसतो आणि शत्रूही. या उक्तीला अनुसरून राज्यात अग्रेसर असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एक असहकार उभा राहात आहे, खुद्द सहकार मंत्र्यांच्या मतदार संघात. भविष्यात हे चित्र प्रत्यक्षात उतरले तर ती सत्ताधीशांसाठी एक मोठी चपराक असणार आहे. पालकमंत्र्यांनी चक्क काँग्रेस नेत्यांबरोबर हातमिळवणी केल्याने शह, काटशहाचे राजकारण उत्तर-दक्षिण दिशेने चांगलेच गाजणार असे दिसते. 


बाजार समितीची निवडणूक अजून जाहीर व्हायची अाहे. पण त्या मागचे राजकारण दिवसेंदिवस रंगात येत आहे. त्यातच आपसातील राजकारण व हेवेदाव्यांमध्ये मागे पडलेल्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी हातमिळवणी केल्याने भाजपमधील असहकाराचे हे नवे समीकरण राज्याच्या सहकार मंत्र्यांना खूप जड जाईल असे चित्र आहे. यात भर घालणारी एक घटना घडली. २८ फेब्रुवारीला चर्चगेटच्या हॉटेल सम्राट या पंचतारांकित हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संध्याकाळी सात वाजता एक गोपनीय बैठक झाली. ही बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बोलावली होती, असे या बैठकीस उपस्थित असलेल्या एका सन्माननीय सदस्याने सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीला अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, बार्शीचे राजेंद्र राऊत, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, माजी आमदार व बाजार समितीचे सभापती दिलीप माने, पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांची उपस्थिती होती. सायंकाळी सात वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल तासाच्यावर चालली. 


माजी आमदार माने यांनीही या बैठकीत झाले गेले विसरून मार्केट कमिटी ताब्यात घेण्यासाठी चंग बांधला आहे. २५ वर्षांची मार्केट कमिटी, भूविकास बँक, जिल्हा परिषद, जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक यावर माने, शेळके, म्हेत्रे, हसापुरे यांचा प्रभाव राहिला आहे. दक्षिणचा कुंभारी व बोरामणी हा मतदार संघ म्हेत्रे यांच्या मतदार संघाला जोडण्यात आला आहे. तेथे त्यांनी ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून हसापुरे यांनी १० कोटी रुपयांचे कर्जवाटप ७० कोटी रुपयांवर नेले. कर्जमाफी योजनेवेळी याच नेतेमंडळींनी पुढाकार घेत कर्जे माफ करवून घेतले. या पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांच्या विरोधात पालकमंत्र्यांनी ठोकलेला छुपा शड्डू रंगत आणेल, यात शंका नाही. 


कुंभारीतून पालकमंत्री इच्छुक 
एरव्ही दोन्ही देशमुखांची 'मैत्री' सर्वश्रुत आहेच. एकमेकांवर कोट्या करण्याचे कारस्थानही समोर आहेच. यातच या मुंबईत झालेल्या गुप्त बैठकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कुंभारी येथून उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांना काहीही करून निवडून आणू, हा मानसही यावेळी झाला.

बातम्या आणखी आहेत...