आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू-मुस्लिम ऐक्यातून साधूया देशाची प्रगती -काझी अमजदअली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नवीन कपडे, अत्तराचा दरवळणारा सुगंध, एेकमेकांना अलिंगण देत शुभेच्छांचा वर्षाव, मैत्री, नात्यामधील गोडवा वाढवणारा शिरकुर्मा-गुलगुले अादी खाद्यपदार्थांचा आस्वाद असे अानंदाचे वातावरण शहर व परिसरातील मुस्लिम कुटुंबीयांच्या घराघरांमध्ये दिसून आले. सामाजिक संदेश देत यंदाचा रमजान सण उत्साहात साजरा करण्यात अाला. हिंदू-मुस्लिम ऐक्यातून देशाची प्रगती साधुया असे आवाहन शहर काझी अमजदअली यांनी यावेळी केले. 


मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने सकाळपासून शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. रमजानमध्ये महिनाभर समाजबांधवांनी रोजा (उपवास) केला. होटगी रस्ता, रंगभवन, आसार मैदान, पानगल हायस्कूल, जुनी मिल कंपाउंड आदी परिसरातील ईदगाहजवळ सामुदायिक नमाज अदा करण्यासाठी समाजबांधव जमले. होटगी रस्ता येथील अलमगीर ईदगाह मैदान येथे शहर काझी अमजदअली काझी यांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर धर्मगुरूंनी समाजबांधवांना उपदेश केला. 


रंगभवन येथे महिलांना सामुदायिक नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली. सामुदायिक नमाज अदा दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीची कोंडी टाळण्याची पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली. 


सर्वत्र शांतता नांदावी : शहर काझी अमजदअली 
सर्वत्र शांतता नांदावी, वाईट गोष्टींचा नाश व्हावा, छोट्या कारणांवरून घरात, समाजात कोठेही वाद करू नका, गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करा, अशी प्रार्थना अल्लाहकडे केल्याचे शहर काझी यांनी सांगितले. पवित्र रमजानच्या महिन्यात आपण ज्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणेच कायम राहण्याचा प्रयत्न करा. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. अल्लाह सोबतचे नाते अधिक घट्ट करा. ज्याचे विचार चांगले तोच खरा मुसलमान. कुराणात सांगितल्याप्रमाणे वागा, असे आवाहन होटगी रोडवरील आलमगीर मैदान येथे संदेश देताना केले. 


रंगभवन मैदान : आपल्या मुलांना उच्चशिक्षित करा 
मुस्लिम समाजामध्ये मुलांना शिक्षण देण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा फायदा घेता येईल तेवढा घ्यावा, विनाकारण यामध्ये वेळ वाया घालवून आयुष्याचे नुकसान करून घेऊ नये. इस्लाममध्ये शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षणाला महत्त्व द्या, असे आवाहन मौलाना ताहेर बेग यांनी केले. याठिकाणी शनिवारी सकाळी आठ वाजता रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे महिलांच्या नमाजाकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. 


अासार मैदान : भाईचारा वाढीस लागावा 
रमजाण सण हा शांतीचा संदेश देणारा असून, समाजातील वाद मिटून चांगुलपणा लागावा, समाजात भाईचारा वाढीस लागावा, अशी अपेक्षा मोहम्मद हुसेन कादरी रजवी यांनी नमाजपठणानंतर व्यक्त केली. आसार मैदानावर नमाजपठणासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

 
पानगल : मिळून मिसळून राहा 
येथे ज्याप्रमाणे सर्वजण एकत्र आला आहात, त्याच प्रमाणे आयुष्य जगताना सुद्धा मिळून मिसळून राहा, असे आवाहन हाफिज मोहम्मद हसन निजामी यांनी केले. पानगल हायस्कूल येथे मौलाना इब्राहिम मंगलगिरी यांनी नमाज पठण केली. तर बयान हाफिज मोहम्मद हसन निजामी यांनी केले. 


जुनी मिल : दिखावा करू नका 
सकाळी ९.३० वाजता जुनी मिल कंपाउंड येथील आदिल शाह ईदगाह येथे नमाज पठण करण्यात आलेे. मुस्लिम बांधवांना कुराण पठण करून संदेश देण्यात अाला. राष्ट्रीयता व सामाजिकता जपून धर्माचे अाचरण करा, शांतता टिकवून ठेवायची आसेल तर धर्माच्या नावाखाली दिखावा करू नका, असा संदेश फजलुल्लाह खतिब यांनी दिला. पोलिसांनी गुलाब फुले देऊन शुभेच्छा दिल्या. 


विविध सामाजिक संघटनांनी पुष्पगुच्छाद्वारे दिल्या शुभेच्छा 
सामुदायिक नमाज अदा केल्यानंतर शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे फुले, पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम यांनी मुस्लिम समाजातील नेतेमंडळी, नगरसेवक, आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. शिरखुर्म्याचा गोडवा चाखला. एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक तौफिक शेख, रियाज खरादी, भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्ष झाकरी हुसेन डोका, डॉ. रफीक शेख, झाकीर सागरी, गायक मोहम्मद अायाज, अन्वर सैफन, माजी महापौर अारीफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कुरेशी यांच्यासह अनेक नेतेमंडळींना भेटून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. 


वाहतूक वळवली 
सामूहिक नमाज पठण असल्याने पोलिसांनी ईदगाह मैदान परिसरातील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली होती. नमाज अदा करण्यासाठी आसरा चौक व गांधीनगरपर्यंत गर्दी होती. सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नमाज अदा करून परत जाताना मुस्लिम बांधवांनी दान केले. पोलिस आयुक्तालयातर्फे अलमगीर ईदगाह परिसरात पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी गुलाबाचे फूल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

बातम्या आणखी आहेत...