आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवरायांना सर्वगुणसंपन्न केले : डॉ. आ. ह. साळुंखे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांचा इतिहास अत्यंत पराक्रमी आहे. तेच संस्कार शिवरायांवर झाले. १२ वर्षांचे होईपर्यंत ते बंगळूरला होते. तेथे शहाजीराजे व जिजाऊंनी विशेष लक्ष देऊन त्यांना प्रशिक्षित केले. त्यामध्ये आक्रमण करणे, दबा धरून बसणे, प्रसंगी तह करणे, तणावाच्या स्थितीत राहणे, बलाढ्य शत्रूची मदत घेणे, सैन्याचे दोन विभाग करून एक शत्रूशी लढणे व दुसरे स्वसंरक्षणास ठेवणे या गुणांनी संपन्न केले होते. या गुणांच्या जोरावर शिवरायांनी इतिहास घडवला. आज आई- वडिलांनी मुलांवर संस्कार करावेत, असे आवाहन प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी दुबई येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. 
यावेळी प्रदीप सोळुंके यांचेही व्याख्यान झाले. जे काळाच्या पुढे राहतात ते विजयी होतात, जे काळासोबत राहतात ते निदान पराभूत होत नाहीत व जे काळाच्या मागे राहतात त्यांचा विनाश होतो. छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढे राहात म्हणून इतिहास घडवू शकले. त्यामुळे आपणही काळाच्या पुढे राहा, असे आवाहन त्यांनी केले. 


या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, दुबई तथा सत्यशोधक विचार मंच, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल मुगल रेस्टॉरंट, अन्सार गॅलरी, दुबई येथे करण्यात आले होते. यावेळी संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह, अबुधाबी, दुबई, अजमान, रास अल खैमा, फुजेरा या प्रदेशातील शिवप्रेमी उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंत रंगारी, इंजिनिअर रामेश्वर कोहकडे, अमोल कोचाळे, संदीप कड, पंकज औटे, सुनंदा दामसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शरद सोनवणे, विक्रम भोसले, संतोष सपकाळे, साईनाथ मांजरे, प्रेरणा रंगारी, संध्या कड, शीतल कोहकडे, रेश्मा कोचळे, रोहिणी मंडलिक, सागर जाधव, निखिल गणूचे व मान्यवर सहकुटुंब उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...