आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा मुलाखतीवर भर, काँग्रेसचा चर्चेचा सूर; मंगळवारी अर्ज माघारची अंतिम मुदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर बाजार समितीसाठी मंत्री, माजी आमदार, माजी सभापती इच्छुक असल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. ३५० हून अधिक जण इच्छुक असल्याने संधी कोणाला मिळणार? हे छाननीनंतरच स्पष्ट होईल. काँग्रेसविरोधात भाजप अशीच निवडणूक रंगणार आहे. भाजपकडून जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे स्वत: गणनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत तर माजी सभापती दिलीप माने यांच्यासह पाच जणांचे उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी यांनी मंजूर केल्याने काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेस नेते अंतिम उमेदवार निवडीसाठी रविवारी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 


अर्ज माघार घेण्याच्या दोन दिवस आधी भाजपकडून अंतिम उमेदवार निवडीचा शोध सुरू करण्यात आला आहे. योग्य व सक्षम उमेदवारासाठी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार दक्षिण तालुक्यातील गणनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. शुक्रवारी कंदलगाव, भंडारकवठे, औराद, होटगी आदी गणांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 


सोमवारपर्यंत अंतिम उमेदवारांची यादी सहकारमंत्री यांना सादर करण्यात येईल. सहकारमंत्री अंतिम उमेदवार ठरवणार आहेत. दुसरीकडे भविष्यातील धोका ओळखून कांॅग्रेसच्या काहींनी एकापेक्षा अधिक मतदारसंघात अर्ज दाखल केला आहे. माजी सभापती दिलीप माने यांच्यासह पाच जणांचे अर्ज मंजूर झाल्याने अंतिम उमेदवार निवडीचा धोका कमी झाला आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गणनिहाय उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 


पालकमंत्र्यांचे एकला चलो रे पण... 
कुंभारी मतदारसंघातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उमेदवारी अर्ज ठेवून सहकारमंत्री व काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. मी अर्ज माघार घेण्यासाठी भरत नसतो, असे वक्तव्य करून निवडणूक लढवण्यावर पालकमंत्री ठाम आहेत. पण, देशमुख यांच्या उमेदवारीमुळे धोका कोणाला? हे अर्ज माघार होईपर्यंत सांगता येणार नाही. सहकारमंत्री यांची अडचण करण्यासाठीच पालकमंत्री यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. शिवाय पालकमंत्री हे दक्षिणमधील काही जागांवर उमेदवार उभे करतील अशी चर्चा आहे. याशिवाय शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील, शिवशरण पाटील व भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या उमेदवारीबाबतही सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. मंगळवारी दुपारीच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

 
संचालकपदासाठी साडेतीनशे उमेदवार इच्छुक 
शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचा भावी संचालक होण्यासाठीच्या निवडणुकीत मंत्री, माजी आमदार, माजी सभापती यांच्यासह विविध गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मंगळवार, दि. १९ जून ही शेवटची मुदत आहे. बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी साडे तीनशेहून अधिक जणांचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत. 

बातम्या आणखी आहेत...