आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधन तुंटपुजे, निवृत्ती वय घटविले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सहा वर्षाखालील बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाचा पाया घडविणे, कुपोषण निर्मूलन, गरोदर-स्तनदा मातांना मार्गदर्शन, किशोरी जागृती करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ ऐवजी ६० वर्षापर्यंत करण्याच्या जाचक निर्णयाचा फटका शहर व जिल्ह्यातील एक हजार पेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बसेल. मानधनवाढीचे आश्वासन देऊन प्रत्यक्ष कृती न करणाऱ्या राज्यशासनाने निवृत्तीचे वय कमी करून निराधार, गरीब महिलांवर अन्यायकारक निर्णय घेऊन फसवणूक केल्याची टीका, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी केली. शासनाच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ सोमवारी शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छत्री मोर्चा काढला. 


महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे सोमवारी हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विविध मागण्यांचे फलक आणि विविधरंगी छत्र्या हातात घेऊन अंगणवाडी सेविकांच्या मोर्चास सुरुवात झाली. अग्रभागी कार्याध्यक्ष मंगला सराफ व उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड होते. 


या प्रमुख मागण्या... 
- केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, मुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मानधनवाढ व भाऊबीज भेटीचा आदेश लवकर काढावा. 
- ६ आॅक्टोबर २०१७ रोजी अंगणवाडी सेविकेस १५०० व सेवा ज्येष्ठता प्रमाणे वाढ, २०१८ पासून मानधनामध्ये ५ टक्के मानधन वाढ करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार एप्रिल २०१८ पासून ५ टक्केऐवजी १० टक्के रक्कम सेवा ज्येष्ठता लाभ म्हणून देण्यात यावी, 
- अंगणवाडी बालकांना पूरकपोषण आहार दिला जातो, पण गेल्या सात महिन्यापासून बचतगटांना शासनाने निधी दिला नाही. पूरकपोषण आहाराचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, लाभार्थ्यांना ४.९२ रुपयांचा आहार दिला जात होता, ही रक्कम ६ रुपयांपर्यंत वाढविली, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. वाढ केलेली रक्कमही अपुरी असून किमान तिपटीने वाढ करावी. 
- अंगणवाडी सेविकांना पाच व दहा वर्षांच्या सेवेनंतर मिळणाऱ्या वाढीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व जेथे देण्यात आलेली नाही तिथे फरकासह द्यावी. 
- आता पीएफएमएस प्रणालीद्वारे पाठविल्या जाणाऱ्या मानधनात ज्या महिन्याचे मानधन आहे, त्या महिन्याचा उल्लेख बँक पासबुकमध्ये करण्यात यावा. 
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरू नयेत व अल्प उपस्थितांच्या अंगणवाड्यांचे एकत्रीकरण करावे, हे परिपत्रक तातडीने रद्द करावे. याबाबत संघटनेशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा. 
- १३ ऑगस्ट २०१४ नंतर तिसरे अपत्य झालेल्या सेविका व मदतनिसांना कामावरून कमी करू नये. 
- वाढत्या लोकसंख्येनुसार मिनी अंगणवाडीचे रूपांतर पूर्ण अंगणवाडीमध्ये करावे. 
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची सुट्टी मिळावी. 


रोजगार हिरावला.. 
शासनाच्या जाचक निर्णयामुळे गरीब, निराधार, विधवा, परित्यक्त्या महिला कर्मचाऱ्यांच्या रोजंदारीचा आधार हिरावून घेत त्यांच्या डोक्यावरील छत्र काढून घेतले. त्याच्या निषेधार्थ डोक्यावर आधारासाठी छत्री घेऊन सेवानिवृत्ती वयातील बदलाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करीत असल्याचे, संघटनेच्या सरला चाबुकस्वार यांनी सांगितले. 


३२ हजार सेविकांना घरचा रस्ता 
 राज्यभरातील सुमारे ३२ हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांना घरचा रस्ता दाखविण्याची तयारी राज्यशासनाची आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाच्या बदल्यात पंधरा टक्के म्हणजे ३२ हजार सेविकांची पदं रिक्त करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाने मांडला. शासनाच्या तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी मानधनावर काम करणाऱ्या गरीब महिलांवर गंडांतर आणले. मानधनवाढ मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागते.
- सूर्यमणी गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना

बातम्या आणखी आहेत...