आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशरी रंग, गुलालाने रंगले पंढरीत विठुराय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- पंढरपूरसह जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) रंगपंचमीची उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाही कोरड्या रंगांची उधळण करत लहान-थोरांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासूनची परंपरा कायम राखली. दरम्यान, येथील श्री विठ्ठल मंदिरात रंगपंचमीनिमित्त श्री विठुरायाची विधिवत पूजा झाली. त्यांच्यावर केशरी रंग, गुलाल टाकून रंगोत्सव साजरा करण्यात आला. 


शहरात सकाळपासून बच्चे कंपनीने रंग खेळण्यास सुरुवात केली होती. दुकाने बंद ठेवून व्यापारीही या उत्सवात सहभागी झाले होते. प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ, जुनी पेठ, संत पेठ, भादुले चौक, महावीरनगर तसेच गजानननगर, मनीषानगर, लिंकरोड, टाकळी रोड परिसर, शाकुंतलनगर आदी उपनगरातून तरुण, तरुणींचे जथ्थे कोरड्या रंगाची उधळण करत फिरत होते. उपनगरात अनेक ठिकाणी तरुणांनी लाऊडस्पीकर लावून रंग उधळत नृत्य सुरू होते. तरुण, तरुणी मित्रांना रंग लावण्यासाठी दुचाकीवर फिरत होते. 


दरम्यान, श्री विठुरायांना पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करून पांढरे पागोटे बांधले. मंदिर समितीचे सदस्य नगराध्यक्षा साधना भोसले, संभाजी शिंदे, सचिन अधटराव, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची विधिवत पूजा झाली. मंदिर समितीने मिरवणुकीचेही आयोजन केले होते. व्यवस्थापक पुदलवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शहरवासीय यात सहभागी होते. बडवे, उत्पात मंडळींनीही डफांच्या मिरवणुका काढल्या. डफ मिरवणुकीत पाण्यासह कोरड्या रंगाची उधळण करण्यात आली. 


नाश्त्यासह रंगोत्सव साजरा 
यमाई तलाव परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर रोज सकाळ, संध्याकाळी फिरावयास येणाऱ्या मंडळींनी रंगपंचमी साजरी केली. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन केले. सकाळपासून ट्रॅक परिसरात रंगोत्सव सुुरू हाेतो. यात ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, वकील, व्यापारी, नोकरदार, पत्रकारांसह महिला, तरुणांचाही सहभाग होता. येथे येणाऱ्या प्रत्येकासाठी थंडाई, उपमा, शिरा, गरम भजी अशा विविध पदार्थांच्या नाश्त्याची सोय केली होती. नाश्त्यानंतर रंग लावले जात होते. लाऊडस्पिकरची सोय केली होती. त्यावरील गाण्यांवर लहान-मोठेपण विसरून सर्वजण नाचत रंगोत्सवाचा आनंद घेत होते. यात महिला, मुलीही होत्या. 

बातम्या आणखी आहेत...