आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदणी नदीत पोेहताना भोवऱ्यात तरुण बेपत्ता, रात्री उशिरापर्यंत शोधकार्य अपयशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- दुथडी भरून वाहणाऱ्या चांदणी नदीत पोहण्यासाठी गेलेला युवक पाण्याच्या भोवऱ्यात सापडून बेपत्ता झाला. रविवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्री उशिरापर्यंत गावातील तरुणांना शोधूनही सापडला नाही. श्रीकांत उर्फ पप्पू युवराज नवले (वय २४, रा. कांदलगाव, ता. बार्शी) असे त्याचे नाव आहे. शोधकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे पथक उशिरापर्यंत पोहोचले नव्हते. 

१५ दिवसांपासूनच्या पावसामुळे चांदणी नदीला पूर आला होता. दोन दिवसांनंतर पाणी आेसरले. तरीही नदी दुथडी भरून वाहत आहे. जलयुक्त शिवारमधून नदीवर बंधारे बांधले आहेत. रविवारची सुटी असल्यामुळे श्रीकांत पोहायला गेला होता. बंधाऱ्याशेजारी आठ ते नऊ युवक पाण्यात उतरले. बंधाऱ्याच्या भिंतीवरून जोरात पाणी खाली कोसळत होते. पाणी उसळत असल्याने तेथे भोवरा बनला होता. पोहोण्यासाठी उड्या मारल्यानंतर काहीजण त्यात अडकले. ते मोठ्या मुश्किलीने त्यातून बाहेर आले. परंतु श्रीकांत त्यात अडकून बुडाला, तो बाहेर आलाच नाही. तो बाहेर येत नसल्याचे पाहून सोबतच्या युवकांनी शोधाशोध सुरू केली. नदीपात्रात सर्वत्र शोध घेतला. वाकडी येथील नावेतून हिंगणगावपर्यंत नदीपात्रात शोधूनही सापडला नाही. शोध लागल्याने बार्शी अग्निशामक दलही सायंकाळी परतले. उपसरपंच प्रदीप नवले यांनी पांगरी पोलिसांना माहिती दिली. सुटीवर असतानाही सहायक पोलिस निरीक्षक ढोणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या. रात्री तहसीलदार हृषीकेत शेळके यांनीही भेट दिली. 

भोवऱ्याशेजारी पोहण्याचा मोह घातक 
श्रीकांत हा बार्शीत काम करत होता. रविवारी सुटी असल्याने दुपारी तो गावाकडे गेला होता. युवकांसोबत पोहण्यास गेल्यानंतर ही दुर्घटना घडली. भोवऱ्याशेजारी पोहण्याचा मोह घातक ठरला. गावोगावच्या जलयुक्तच्या बंधाऱ्यात पोहताना काळजी घेण्याची गरज आहे. बंधाऱ्यातील गाळामुळेही धोका होऊ शकतो. गतवर्षी शहरानजीकच्या वाघमारे वस्तीवरील मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला होता. 

कांदलगाव येथील घटनास्थळी भेट दिली. तरुणाच्या शोधकार्यासाठी सोमवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापनचे पथक पाठवण्यात येईल.
- हृषीकेत शेळके, तहसीलदार, बार्शी 
बातम्या आणखी आहेत...