आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आस सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे दर्शन घेणारे भाविक. - Divya Marathi
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे दर्शन घेणारे भाविक.
माउली पालखी मार्गावरून - माउलींच्या सोहळ्याला १८२ वर्षे पूर्ण झाली. ही परंपरा संत हैबतबाबांनी पुन्हा सुरू केली. आजही त्याच परंपरेचे पालन करीत हा पालखी सोहळा सुरू आहे. ३०० दिंड्या यात सहभागी झाल्या, अशी माहिती ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब पवार (आरफळकर) यांनी दिली. ते हैबतबाबांच्या घरातील पाचवे वंशज. ते म्हणाले, सोहळ्यात यंदा प्रशासन, पोलिसांनी जास्तीत जास्त सुविधा दिल्या. वाहनांची सुव्यवस्था केली. यामुळे वारकऱ्यांना वारी अगदीच सुलभ झाली.
पंढरीचा वास, चंद्रभागेत स्नान
आणिक दर्शन विठोबाचे
हेचि मज घडो, जन्मोजन्मांतरी
मागणे श्रीहरी नाही दुजे ।।
याउक्तीप्रमाणे हजारो वारकरी आज वाखरीतून पंढरीच्या दिशेने आपापल्या पालखी सोहळ्यासह, दिंड्यांसह रवाना झाले. पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी हे लाखो वारकरी थकवा विसरून पंढरी जवळ करत आहेत. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस असलेले भाविक झपाट्याने पंढरी जवळ करीत आहे. वाखरी येथे पालखी तळावर विविध संतांच्या पालखीचे दर्शन घेतले. खारका उधळल्या. चंदनाच्या झाडांची पाने संतांच्या चरणी वाहिली.
आता विठ्ठलची आहे विसावा : आता विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत वैष्णवांचा मेळा जमला आहे. कारण वाखरीतून मुक्काम हलवल्यानंतर पंढरपूर जास्त लांब राहिलेले नाही, या जाणिवेतून थकलेल्या पायांना पुन्हा बळ दिले जात आहे. आता सांगता धावा केला जातो आहे. धावा म्हणजे पावलांना नवी चाल देणे. विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले तरी असंख्य भाविकांना गहिवरून येते. विठ्ठलाचे पदस्पर्श करून डोळे भरून विठ्ठलाला मनात साठवायचे असते. म्हणूनच वारकऱ्यांना हा विठ्ठल विसावा.
काही ठिकाणी उत्तम नियोजन : पोलिस बंदोबस्त, पाण्याची व्यवस्था, पालखी तळाच्या सोयी यंदा सर्वच उत्तम झाले, काही ठिकाणी असुविधा जाणवल्या. काही ठिकाणी चांगले झाले, काही ठिकाणी नाही, असे मत समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज सोहळ्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी व्यक्त केले.
पायात बळ असेपर्यंत दर्शनाची ओढ कायम : वारकऱ्यांच्या भावना
चालून चालून पायात गोळे आले, तळव्यांना चिरा पडल्या, भुकेने कळवळले असतील, पण विठुदर्शनाची आस सर्वांवर मात करीत होती. या उत्कट भावना कोणत्याही चौकटीत मावणाऱ्या नाहीत, याचीच ही प्रचिती होती. याच भक्तीच्या मार्गावरून त्यांचे आजोबा, पणजोबा चालले होते. शेकडो वर्षे वारीची ही परंपरा सुरूच राहिली. जोवर पायात बळ आहे, जोपर्यंत विठ्ठल पंढरीत बोलवेल तोपर्यंत यायचेच, अशी भावना वारकरी व्यक्त करतात. ऊन, वारा, पाऊस, गैरसोय सहन करीत ते पंढरपूरच्या दिशेने अनेक दिवसांपासून चालत राहिले आहेत. मिळेल तेथे ते विसावतात. चोपदाराच्या इशाऱ्यांवर थांबतात, मुक्काम करतात, पुन्हा चालत राहतात. वारी करण्याचे हे काम इतके कष्टदायक आहे. पण देहाला अधिकाधिक श्रम देत एकाच दिशेने, एकाच उद्देशाने लाखो वारकरी हेच एक आश्चर्य बनत चालले आहे, याची प्रचिती वारी अनुभवलेल्या सगळ्यांनाच मिळत असते. म्हणूनच एक तरी वारी अनुभवावी, श्रद्धेचा हा जागर अनुभवावा, या अफाट शिस्तीच्या वारकऱ्यांचेच दर्शन घ्यावे.