आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरधाव टेम्पोची धडक, ‘राम नाम’घेत निघालेल्या ४ भाविकांचा अपघाती मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ (जि. सोलापूर) - गावात चालू असलेल्या रामायण कथेमधील ‘वनवासा’साठी पायी निघालेल्या रामभक्तांवर काळाने झडप घातली. टाळ, मृदंग, वीणा व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ‘श्रीराम जय राम जय जय राम'चा जयघोष करत पायी निघालेल्या भक्तांना भरधाव टेम्पोने मागून चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना सोमवारी (दि. २१) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ येथील वडवळजवळ घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे रामायण कथासार सुरू असून त्यात प्रभूरामचंद्राची जीवनगाथा मांडली जात आहे. कार्यक्रमात सर्व गावकरी सहभागी झाले आहे. रामायणात श्रीराम वनवासाला गेले होते. त्याचे प्रतीक म्हणून यापैकी काही भाविक वनवासाला निघाले होते. गावातील २५ पुरुष व सहा महिला रविवारी (दि. २०) दुपारी वडाळा येथून लांबोटी मार्गे मोहोळ व तेथून पंढरपूरकडे निघाले होते. रविवारी लांबोटी येथे सर्वांनी मुक्काम करून रात्री भजन, कीर्तन केले.

सोमवारी पहाटे सर्वजण टाळ, मृदंग, वीणाच्या गजरात मोहोळकडे येत होते. पहाटे पाच वाजता वडवळपासून जवळच पाठीमागून भरधाव येणाऱ्या एका टेम्पोने दत्तात्रय विठ्ठल शेंडगे (वय ५४), विलास अंबादास साठे (४०), सुभाष ऊर्फ भाऊ नारायण जाधव (४८) व जिजाबाई सुब्राव गाडे (६०, सर्व रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) यांना जोराची धडक दिली. यात तिघांच्या अंगावरून टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जिजाबाई गाडे रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्याने जबर मार लागून त्यांचीही प्राणज्याेत मालवली. अपघाताचा आवाज जोरात आल्याने दिंडीच्या पुढील बाजूस असलेले भाविक सावध झाले. त्यांनी त्वरित १०० क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधला. अपघातानंतर अटकेच्या भीतीने टेम्पो चालकाने पळ काढला.

मृत विलास साठे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुभाष जाधव यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जिजाबाई गाडे यांच्या मागे पती, दोन मुलगे, एक मुलगी तर दत्तात्रय शेंडगे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मोहोळ ग्रामीण रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात अाले. वडाळा येथे मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे संपूर्ण गाव शोकाकूल झाले होते.

सतर्क झाल्याने इतरांचा जीव वाचला
अपघाताचा आवाज जोरात आल्याने पुढे चालत निघालेले इतर भाविक सावध झाल्याने त्यांचा जीव वाचला, अशी माहिती उपस्थितांनी दिली. दरम्यान, मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या व जखमींच्या नातेवाइकांनी माेठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

सीसीटीव्ही फुटेजवरून तपास
दिंडीतील सहभागी इतर भाविकांनी धडकून गेलेल्या टेम्पोची माहिती पोलिसांना दिली आहे. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजवरून टेम्पोचा तपास सुरू आहे. टेम्पोच्या चौकशीसाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
- सूरज बंडगर, पोलिस निरीक्षक, मोहोळ
पुढे वाचा कशी असते वनवासी दिंडी.. पाहा PHOTO
बातम्या आणखी आहेत...