सोलापूर - ट्रिपलसीट धूम स्टाईल बाईकस्वारांना अावरण्याची वेळ अालीय. त्यांच्यामुळे शहरात दररोज तीन-चार तरी किरकोळ अपघात होत अाहेत. या बाबी पोलिस ठाण्यापर्यंत येत नसल्यामुळे याचे गांभीर्य समोर अाले नाही. पण, मागील अाठ दिवसांपासून असे तीन अपघात झाले अाहेत. शुक्रवारी सकाळीच डफरीन चौकात एका शिक्षकाच्या दुचाकीला ट्रिपल सीटचालकाने जोरदार ठोकरल्यामुळे ते जखमी झाले अाहेत. सकाळी सातच्या सुमाराला काॅलेज, खासगी शिकवणीसाठी अनेक विद्यार्थी बाहेर पडतात. त्यावेळी पोलिसही चौकात नसतात. त्यामुळे भरधाव वेगात दुचाकी चालविण्याचे प्रकार सर्रासपणे दिसून येतात. या घटनांवर अंकुश ठेवण्याची वेळ अाली अाहे.
होटगी रस्ता, विजापूर रस्ता, सात रस्ता, जुना एम्प्लाॅयमेंट चौक, डफरीन ते शिवाजी चौक, सम्राट चौक, दयानंद काॅलेज परिसर, वालचंद काॅलेज परिसर, जुना तुळजापूर नाका या भागात काॅलेज तरुण भरधाव वेगात वाहने चालवितात. सकाळी अनेक पालक मुलांना शाळेत सोडण्यासाठी, रेल्वे स्टेशनला इंटरसिटीला नातेवाइकांना सोडण्यासाठी, परगावी जाण्यासाठी बाहेर पडतात. त्याचवेळी काॅलेजकुमार तरुणही अनेक रस्त्यावरून भरधाव वेगाने जातात. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी दुंडका दाखवावा. याबाबत वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष काणे यांना विचारले असता, जनजागृती करण्यासाठी सकाळच्या सत्रात कारवाई मोहीम हाती घेऊ. महत्त्वाच्या ठिकाणी फिरते पेट्रोलिंग पथक ठेवूयात.
पोलिस निरीक्षक सुनील जाधव म्हणाले, काॅलेज परिसर, गर्दीच्या ठिकाणी सकाळी माईकवरून सूचना देऊयात. दोन- तीन दिवसात बदल नाही दिसल्यास कारवाई मोहीम हाती घेऊ, असे म्हणाले.
असे घडले अपघात
शुक्रवारी डफरीन चौकात एका शिक्षकाला दुचाकीची धडक बसली. अाठ दिवसांपूर्वी विजापूर रोडवर डाॅक्टरच्या मुलाला किरकोळ जखम झाली. शिवाजी चौकात चार दिवसांपूर्वी एक शिक्षक दुचाकीवरून जात होते. बाजूचा दुचाकीस्वारासमोर गाय अाडवी अाल्यामुळे ते बाजूला अाले. दोघांच्या गाड्या एकमेकांवर पडल्यामुळे शिक्षक काही काळ बेशुद्धच होते.