आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोट्या माहितीने रेल्वेची बदनामी कराल तर तुरुंगवास, IT कायद्याअंतर्गत कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - खोट्या माहितीच्या आधारे रेल्वेची जनसामान्यांतील प्रतिमा मलिन करणारे मजकूर, संदेश, व्हिडिओ, फेसबुक अथवा  व्हॉट्सअॅपवरून प्रसारित करणे किंवा रेल्वे प्रवासात एखादे खोटे टि्वट करून रेल्वे प्रशासनाची दिशाभूल करणे यापुढे विनाकारण महागात पडू शकते. कारण नसतानाही रेल्वेची प्रतिमा मलिन करणाऱ्या मंडळींविरुद्ध रेल्वे प्रशासन थेट माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फौजदारी स्वरूपाची  कारवाई करणार आहे. या संदर्भात रेल्वे मंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून चर्चा सुरू असून लवकरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रेल्वे मंत्रालय लवकरच राज्याच्या सायबर सेलशी या चर्चा करुन अंमलबजावणीसाठी पाऊल उचलणार आहे. मागील अनेक दिवसांपासून रेल्वेशी संबंधित निरर्थक आणि खोट्या स्वरूपाचा मजकूर तसेच तथ्यहीन बातम्या सामाजिक संकेतस्थळांवरून व्हायरल होत आहेत. या माहितीची विश्वासार्हता न तपासताच सोशल मीडियावरील काही जण ती थेट पुढे पाठवत आहेत. यामुळे प्रवासी तसेच प्रशासनातही गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. 
 
दुसरीकडे रेल्वे प्रशासन खोट्या टि्वटला कंटाळले आहे. काही प्रवासी टि्वटद्वारे खोटी माहिती देऊन रेल्वेची दिशाभूल करत आहेत. देशभरातून रोज रेल्वे मंत्रालय तसेच रेल्वेमंत्र्यांना तीन हजारांहून अधिक तक्रारी टि्वटरद्वारे येतात. यातील बहुतांश तक्रारी सत्यही असतात. तर, एक ते दोन टक्के तक्रारी या खोट्या असतात. शिवाय, काही तक्रारींचे कारण अगदी क्षुल्लक असते.  रेल्वे मंत्रालयाकडून ट्विट आल्यानंतर विभाग स्तरावर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते. अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ होते.  त्यामुळे खोट्या तक्रारदारांना धडा शिकवण्यासाठी रेल्वेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

बदनामी करण्याच्या प्रकारांत वाढ
गेल्या काही दिवसांत खोट्या माहितीच्या आधारे भारतीय रेल्वेची बदनामी करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. तसेच खोट्या ट्विटचेही प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारांवर अंकुश घालणे गरजेचे असून त्यासाठी प्रभावी यंत्रणा अस्तित्वात आणली जात आहे - अनिलकुमार सक्सेना, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली.
बातम्या आणखी आहेत...