आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद देऊन परतताना वकिलाचा निर्घृण खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - सुळेवाडी (ता. माळशिरस) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अॅड. नामदेव सोलनकर यांची गुरुवारी पिलीवजवळ निर्घृण हत्या करण्यात आली. राजकीय वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय अाहे.

गुरुवारी सकाळी सुळेवाडीत पाणी टँकरमध्ये भरण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला हाेता. हाणामारीही झाली. यासंदर्भातील फिर्याद देण्यासाठी अॅड. सोलनकर माळशिरस पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या अंकित पिलीव आऊटपोस्टमध्ये गेले होते. फिर्याद देऊन ते परत जात असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिलीवजवळील ओढ्यालगत अाठ ते नऊ जणांच्या जमावाने त्यांची दुचाकी अडवली. तसेच काही जणांनी डाेळ्यात मिरचीची पूड टाकून सोलनकर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचे भाऊ दुर्योधन सोलनकर यांनी गजानन सोलनकर, बीरा माने, सर्जेराव माने, किसन सुळे, तानाजी माने व इतर पाच ते सहा जणांविरोधात माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली अाहे. यापैकी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, गावात झालेले भांडण वाढू शकते, असे सोलनकर यांनी आमदार हनुमंत डोळस यांना कळवले होते. त्यानंतर डोळस यांनी माळशिरसचे पोलिस निरीक्षक अशोक देशमुख व अकलूजचे पोलिस उपअधीक्षक तिरुपती काकडे यांना याबाबत दखल घेण्यास सांगितले हाेते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याची तक्रार डाेळस यांनी केली अाहे.

राजकीय वाद
सुळेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात सोलनकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. विरोधी गटातील तीन सदस्यांनी जातीचे प्रमाणपत्र व हिशेब सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यासाठीही सोलनकर यांनी पाठपुरावा केला होता. तेव्हापासून त्यांच्यात व विरोधी गटात वाद धुमसत होता.
बातम्या आणखी आहेत...