आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिर समिती बरखास्तीसाठी वारकऱ्यांचे आंदोलन, राजकीय पुनर्वसनासाठी समितीचा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र.
पंढरपूर- राजकीय लोकांचा भरणा असलेली नवनियुक्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती त्वरित बरखास्त करावी या मागणीसाठी येथील नामदेव पायरीजवळ वारकरी संप्रदायामधील महाराज मंडळींनी लाक्षणिक भजन आंदोलनाने राज्य सरकारविरुद्ध शनिवारी एल्गार पुकारला.
 
जोपर्यंत शासन ही मंदिर समिती बरखास्त करीत नाही तोपर्यंत वारकरी संप्रदाय संपूर्ण राज्यभर टप्प्याटप्याने वेगवेगळी आंदोलने उभी करील, असा इशारा समस्त वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिला. त्यामुळे शेतकरी आंदोलनाप्रमाणे वारकऱ्यांचेदेखील आंदोलन चिघळणार का, असा सवाल आता सर्वसामान्य भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.     

जळगावकर म्हणाले, श्री विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ आहे. यावर वारकरी संप्रदायामधीलच व्यक्ती असणे गरजेचे आहे. तरीदेखील राज्य शासनाने नुकतीच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती जाहीर केली. मात्र तरीदेखील शासनाने आमच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: वैयक्तिक लक्ष घालून ही समिती त्वरित बरखास्त करावी. नवीन समितीची नियुक्ती करताना त्यामध्ये सर्व जण वारकरी संप्रदायामधील असावेत, अशी मागणी केली. या आंदोलनामध्ये अगदी नामदेव पायरीपासून ते शाकंभरी, श्री खंडोबा मंदिरापर्यंत महाराज मंडळी, वारकरी, फडकऱ्यांची गर्दी झालेली होती. वारकरी संप्रदायामधील सर्व मंडळी रामकृष्ण हरी या बीजमंत्राचा जप करीत सहभागी झालेली होती.     

या आंदोलनामध्ये आळंदी येथील राजाभाऊ चोपदार, भागवत महाराज चवरे, राऊ महाराज वासकर, देवव्रत ऊर्फ राणा महाराज वासकर, रामेश्वर शास्त्री, भानुदास महाराज ढवळीकर,  केशव नामदास महाराज, बंडातात्या कराडकर, बाळासाहेब आरफळकर, प्रकाश महाराज जवंजाळ, मुक्ताबाई देवस्थानचे रवींद्र पाटील, विठ्ठल महाराज वासकर, चैतन्य महाराज कबीर, संजय महाराज देहूकर, दादा महाराज शिरवळकर, श्रीकांत ठाकूर, नरहरी चौधरी, राजेंद्र महाराज देहूकर, वारकरी संप्रदायामधील महाराज मंडळी, वारकरी, फडकरी, विविध दिंड्यांचे प्रमुख सहभागी झाले होते. येथील ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे भजन करणाऱ्या बालवारकरी विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग नोंदवला.    

राजकीय पुनर्वसनासाठी समितीचा वापर
या समितीमध्ये वारकरी संप्रदायामधील दोन महाराज सोडले तर इतर सर्व नियुक्त्या या राजकीय मंडळींच्या केलेल्या आहेत. राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शासनाने या समितीचा वापर केला आहे. त्यामुळे ही समिती वारकरी संप्रदायास मान्य नाही. गेली तीन वर्षे याबाबत शासनाकडे संप्रदायातील महाराज मंडळी पाठपुरावा करीत आहोत.
बातम्या आणखी आहेत...