आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर यात्रा: भूकैलासात रंगला अनुपम अक्षता सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ ९०० वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अनुपम अक्षता सोहळा गुरुवारी दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला. ओम सिद्धरामा नम:... दिड्ड्यम् दिड्ड्यम्... सत्यम् सत्यम्... नित्यम् नित्यम् या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले अन् लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी २.१० वाजता सुरुवात झाली. एकदा भक्तलिंग बोला... हर्र... बोला हर्र..चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता.
शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाच्या काठ्या (नंदीध्वज) संमती कट्ट्याजवळ दुपारी एक वाजता दाखल झाल्या. पंचाचार्यांचा समता ध्वज, पालखी होती. नाशिक ढोल या मिरवणुकीत होता. सात काठ्या विविधरंगी फुलांनी सजवल्या होत्या. मानाच्या पहिल्या काठीला सुंदर बाशिंग बांधलेले होते. सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत सात काठ्या आल्या. पांढरे बाराबंदी, धोतर, डोईवर पांढरा फेटा, कपाळाला गंध अशा पेहरावात लाखाे भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले.

सुहास शेटे यांनी संमती वाचनाला प्रारंभ केला. दिड्ड्यम् दिड्यम्, सत्यम् सत्यम् मंत्रोच्चारात पाच अक्षता टाकण्यात आल्या. सव्वादोन वाजता अक्षता सोहळा पूर्ण झाला. उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सिद्धरामेश्वरांचा जयजयकार केला. यानंतर दर्शनाकरता रांगा लागल्या. भाविकांनी एकमेकांना मकर संक्रातच्या शुभेच्छा दिल्या. वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड, इंग्रजी, मराठी अशा विविध भाषेतून सिद्धरामेश्वरांचा जयजयकार करत सूत्रसंचालन केले.
मान्यवरांची उपस्थिती
यंदायात्रेसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक हजेरी लावली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्ज्वला आमदार प्रणिती यांच्यासह उपस्थित होते. याच गॅलरीत खासदार अॅड. शरद बनसोडे पत्नी वर्षा बनसोडे उपस्थित होते. आमदार प्रशांत परिचारक यंदा आले होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख सर्वसामान्यांप्रमाणे संमती कट्याजवळ होते.
थेट प्रक्षेपण आणि स्क्रीनची सुविधा
अक्षता सोहळ्याच्या वेळी लाखो भाविकांसाठी दोन स्थानिक वाहिन्यांनी अक्षता सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले. संमती कट्ट्याजवळ मोठ्या स्क्रीनची व्यवस्था होती.
जिल्हाधिकारी अनुपस्थित
देवस्थानसमिती आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील वादाचे सावट भाविकांच्या चर्चेत दिसून आले. बाराबंदीच्या पोशाखात महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवली. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची उपस्थिती नव्हती.
‘दिव्य मराठी’ वाचकांसाठी भिरभिरत होता एक कॅमेरा
ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा क्षण अक्षता सोहळा. हाच क्षण टिपण्यासाठी खास ‘दिव्य मराठी’साठी कॅमेरा लावलेला एक ड्रोन आकाशात भिरभिरत होता. या कॅमेऱ्याने टिपलेले नयनमनोहर छायाचित्र.
अशी यात्रा कधीच पाहिली नाही
माझ्या शासकीयसेवा काळात अशी यात्रा कोठेच पाहिली नाही. मी बाराबंदी घालून यात्रेत सहभागी झालो. बाराबंदी काढण्याचे मन होत नाही. अक्षता सोहळा काळात स्वर्गात असल्यासारखे वाटते. माझे मन भरून आले. विजयकुमार काळम-पाटील, मनपा आयुक्त