आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला, थवा वैष्णवांचा दारीं दर्शनासी आला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - ऊठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला थवा वैष्णवांचा दारीं दर्शनासाठी आला ।।
या अभंगाप्रमाणे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगद््गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या दशमीदिवशी पंढरीत दाखल झाल्या. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलगंणा आणि मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने रेल्वे, एसटी तसेच खासगी वाहनांमधून सुमारे सहा लाखांहून अधिक वारकरी गुरुवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे अठरा तासांहून अधिक कालावधी लागत आहे.

आषाढी एकादशीच्या या अनुपम सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अजूनही भाविक पंढरीकडे येत आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व पालख्यांचे येथील विसावा मंदिराजवळ स्वागत करण्यात आले. श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सपत्नीक दुपारी आगमन झाले. वारकरी सांप्रदायातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ज्या आषाढी वारीकडे पाहिले जाते तो एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, पंढरीच्या राजस सुकुमाराला डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत मजल दरमजल करत लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श तसेच मुखदर्शन रांगेत उभे आहेत. मागे पुढे उभा राही सांभाळीत अलिया आघात निवाराया ।। या श्रद्धेने वारकरी श्री विठूरायावर हवाला ठेवत अडचणींना तोंड देत परंपरेने घराण्याचा पंढरीच्या वारीचा वारसा आजही पुढे चालवत आहेत. पुण्यनगरी पंढरीत सगळीकडे टाळ मृदंगाच्या निनादात हरिनामाचा गजर होत असल्यामुळे भक्तिरसात पंढरीनगरी न्हाऊन निघाली आहे. विविध मठ, धर्मशाळा यांमधून भजन, कीर्तन प्रवचनाचे स्वर कानी पडत आहेत.

शहराबाहेर वाहनांच्या रांगा
यावर्षी वाहतूक व्यवस्थेत बदल केल्यामुळे आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे खासगी वाहनांमधून वारीसाठी आलेल्या भाविकांना शहराबाहेर दूरवर आपली खासगी वाहने उभी करावी लागत आहेत. त्यामुळे शहराबाहेर लक्झरी बसेस, टेम्पो, ट्रक त्याचप्रमाणे चारचाकी गाड्यांच्या देखील रांगा लागलेल्या दिसत आहेत.

अथांग महासागराची प्रचिती
वारीसाठीआधीच दाखल झालेल्या संतांच्या पालख्यांमधील वारकरी आणि माउली, तुकोबांच्या दिंडी सोहळ्याबरोबर आलेले वारकरी शहरात जेव्हा सायंकाळी एकत्रित आले. तेव्हा दोन सागरांचा संगम होऊन त्यामधून तयार झालेला वैष्णवांचा अथांग महासागर अक्षरश: ओसंडून वाहत असल्याची प्रचिती येत होती.

पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेले वारकरी फेर धरून भजन, कीर्तनात दंग झाले होते. छाया: राजू बाबर
बातम्या आणखी आहेत...