आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... रक्तामधला भीमराव पाहिजे, बाबासाहेबांंमुळेच दलित समाज सत्तेचा मानकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रनिर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सोहळ्याला सुरुवात झाली. आंबेडकर (पार्क) चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनता गटागटाने लोटत होती. मध्यरात्री बाराचा गजर होताच जल्लोषात युवक, राजकीय नेते, संस्थांचे प्रमुख यांनी पुतळ्याकडे धाव घेतली. दुचाकीस्वारांची गर्दी झाली होती. १२५ वा जन्मदिन असल्याने यंदा जयंतीउत्सवातील जल्लोषाचा नूर काही वेगळाच दिसत आहे. राज्यघटनेचा निर्माता, दीनदलितांचा मुक्तीदाता, महामानव अशा नाना उपाधी साहित्य, कवींनी बाबासाहेबांना दिल्या. त्याचा उल्लेख ध्वनिक्षेपकावर वाजणाऱ्या भीमगीतांमधून होत होता. ठिकठिकाणी, चौकाचौकात मंडळांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. ‘ना भाला ना बर्ची ना तलवार पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे’
शहरातबहुतांश भागात निळेमय वातावरण झाल्याचे भासत होते. पांढरे कपडे, डोक्यावर निळी टोपी धारण केलेले नागरिक जय भीमचा नारा देत चौकात येत होते. बुधवार पेठ, मिलिंद नगर, सम्राट चौक, कुमठा नाका, जोडभावी पेठसह आदी भागातील नागरिकांचा यात समावेश होता.
महापालिकेच्या वतीने महापौर प्रा. सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, सभागृह नेता संजय हेमगड्डी, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी अभिवादन केले. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक संकलेचा, आरपीआयचे राजा सरवदे, प्रमोद गायकवाड, महेश निकंबे आदी त्यात होते. दिवसभर हजारो भीमप्रेमींनी रांगेत जाऊन अभिवादन केले.

पाणी आणि खाऊ वाटप
फॅम संस्थेच्या वतीने बाबासाहेबांची चळवळ कशी चालवावी यावर उपस्थितांचे मत नोंदवण्यात आले. चौकात कपिल घाडगे मित्र परिवार, पीबी ग्रुप महापालिका वाहन संघटनेच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली. मीनाक्षी प्रक्षाळे यांनी पाणीपाऊच वाटप केले. त्यामुळे आलेल्या नागरिकांची पाण्याची सोय झाली.

पोलिस बंदोबस्त
डाॅ. आंबेडकर चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शिवाजी चौकाकडून येणारी वाहतूक सिद्धेश्वर मंदिराकडे तर डफरीन चौकाकडून येणारी वाहतूक शुभराय आर्ट गॅलरीकडे वळवण्यात आली. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. अभिवादन केले.
शहरात विविध कार्यक्रम
जयंतीच्या निमित्ताने विविध भागात पाणीवाटप, खाऊ वाटप, अभ्यास, साडीवाटप, जन्मलेल्या मुलीच्या नावाने ठेव ठेवणे, विद्यार्थी दत्तक, गरीब विद्यार्थ्यांना मदत, रुग्णांना मदत, भीमगायन आदी कार्यक्रम पार पाडले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रगल्भ बुद्धिमत्ता अन्् नेतृत्व कौशल्य याचा अंदाज महात्मा गांधीजींना पुणे कराराच्या निमित्ताने आला. त्यामुळेच गांधीजींनी घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेबांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, अन् संपूर्ण जगात आदर्शवत राज्यघटना तयार झाली. तसेच, धडपणाऱ्या दीन-दलित समाज सत्तेचा मानकरी झाला, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारण्यात आलेला अशोक स्तंभ राज्यघटना प्रस्तावनेचे उद््घाटन, डॉ. आंबेडकर उद्यानातील पुतळ्याची मेघडंबरी अन् डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील हायड्रोलिक्स शिडीचे उद््घाटन गुरुवारी शिंदे यांच्या हस्ते झाले. डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळीमहापौर सुशीला आबुटे, आमदार प्रणिती शिंदे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, महापालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, रिपाईचे प्रदेश सचिव राजाभाऊ सरवदे, राजा इंगळे, बसपाचे प्रदेशनेते राहूल सरवदे, अॅड. संजीव सदाफुले, स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, “धडपणाऱ्या समाजाला हक्क अन् स्वाभिमान मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परीश्रामुळेच आम्ही सत्तेचे मानकरी झालोत. डॉ. बाबासाहेबांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचीही आठवण या निमित्ताने होत असून मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या नावाने योजना सुरू केली.”

डॉ. आंबेडकरांच्या नावाने शहरामध्ये ग्रंथालय अभ्यासिका सुरु करण्यासाठी डफरीन चौकातील जागा देणे महापालिका शक्य असल्यास त्याबाबतचा ठराव करून द्यावा, अशी शिफारास त्यांनी केली. स्मार्टसिटीमध्ये सोलापूरचा समावेश एक-दीड वर्षातील कामांमुळे झाला नाही. मागील काही वर्षात आम्ही केलेल्या कामांमुळेच ते घडले. उजनी धरणातून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याबाबत मी त्यावेळी घेतलेल्या निर्णयावर टिका झाली. पण, आज त्याबाबतचे महत्व दिसून येते, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

रिपाईचे प्रदेश सचिव सरवदे म्हणाले,“डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील चौकात डिजीटल फलक लावून विद्रुपीकरणाचे प्रकार वाढले होते. त्यामुळे तत्कालीन नगरसेवक अरुण भालेराव यांच्यामार्फेत चौकामध्ये राजमुद्रा उभारण्याबाबतचा प्रस्ताव सर्वप्रथम आम्ही दिला. त्यास महापालिकेने मंजुरी दिली. पण, तांत्रिकी अडचणींमुळे तो प्रस्ताव रखडला. पण, माजीकेंद्रीयमंत्री शिंदे यांच्यासह अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आज तो प्रस्ताव मार्गी लागला.”
बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले,“शिंदेसाहेब तुम्ही सत्तेत असताना तुमच्याकडे अडचणी सांगण्यासाठी आम्ही जवळ येण्याचा प्रयत्न केला.पण, तुमच्याच लोकांना जवळ येऊच दिले नाही. डॉ. आंबेडकर यांंच्या नावाच्या सर्वच प्रस्तावांना विरोध करण्याचे प्रकार घडच आहेत. जयंतीसाठी शहरामध्ये लावलेले डिजीटल काढणे, चौकांमध्ये डॉल्बी येऊच नये म्हणू शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.” विसर्जन मिरवणूकीची वेळ फक्त दहा वाजेपर्यंत ठेवण्याची नोटिस मध्यवर्ती मंडळास पोलिसांनी दिली आहे. डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना दडपण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरु असून तो अन्याय सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आमदार प्रणित शिंदे म्हणाल्या,“डॉ. आंबेडकरांच्या नावावर मतं मिळवणारे भाजप शिवसेनेचा एकही नेता आज जयंती निमित्ताने अभिवानासाठी फिरकला नाही. सोलापूरचे खासदार अॅड. बनसोडे हेही अभिवानादासाठी आले नाहीत. दिशाभूल करणाऱ्यांना जनता योग्य जागा दाखवते. समाजामध्ये एकजूट असली तरच खऱ्या अर्थाने परिवर्तनाची क्रांती घडणार आहे. राजकारण बाजूला ठेवून समाजाकारणासाठी एकत्र येण्याची गरज आहे. पण, दुर्देवाने समाजात असलेल्या मतभेदाचा फायदा घेऊन सत्ताधाऱ्यांनी देशाचे विभाजन करण्याचा डाव मांडला आहे.”
याप्रसंगी राजा इंगळे, बसपानेते राहूल सरवदे, उपमहापौर प्रवीण डोंगरे यांची भाषणं झाली.

महापौरांच्या स्पष्टीकरणानंतरही शिदेंची टिका
कार्यक्रमाच्या सुरवातीला महापौर सुशीला आबुटे यांनी अशोकस्तंभ राज्यघटना प्रास्तविकाच्या उदघाटनास इतर कार्यक्रमास सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख उपस्थित राहणार होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईत मोठा कार्यक्रम असल्याने ते येऊ शकले नाहीत. पण, त्यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठविल्या असल्याचे जाहीर केले. पण, आमदार शिंदे यांनी महापाैरांनी खुलासा केलेला असतानाही जयंती निमित्ताने अभिवादनासाठी एकही भाजप शिवसेना नेते फिरकला नाही. खासदारही फिरकले नसल्याची टीका केली.

श्रेयावरून शितयुद्ध
डॉ. आंबेडकर चौकात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभासाठी रिपाईने सर्वप्रथम पुढाकार घेतल्याचे राजा सरवदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. चौकात स्तंभाच्या ऐवजी इतर काही गोष्टी उभारण्याचा खटाटोप सुरु होता. पण, बसपाने केलेल्या प्रयत्नांचा पाढा पक्षाचे नेते राहूल सरवदे वाचला. तर, काँग्रेसने सर्वांच्या मदतीने हा प्रश्न मार्गी लावल्याचे सभागृहनेते हेमगड्डी यांनी स्पष्ट केले.
तुम्हीच परदेशवारी करता, जरा कॅबिनेटकडे बघा
दहावेळी परदेश दौरा करणाऱ्या महापौर फार भाग्यशाली असल्याचे उपमहापौर डोंगरे यांनी सांगितले. यापुढे फक्त तुम्ही एकटेच दौरे करू नका, जरा कॅबिनेटकडेही पहा, असे म्हणताच उपस्थितांचे हास्याचे करांजे उडाले.

समता सैनिक दलाची रॅली
समता सैनिक दलाने शिस्तबद्ध संचलन रॅली काढली. यात घोडेस्वार, महिलांचे संचलन पथक, बँड पथक, ध्वजधारीचा समावेश होता. चौकात आल्यानंतर अभिवादन करण्यात अाले.
डॉ. आंबेडकर चौकातील अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे. यावेळी महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, आमदार प्रणिती शिंदे, राजा सरवदे, विश्वनाथ चाकोते, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे आदी.
बातम्या आणखी आहेत...