आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णवाहिका, शववाहिका डिझेल मिळत नसल्याने बंद; गेल्या 15 दिवसांपासूूनची स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका डिझेल पुरवत नसल्याने रुग्णवाहिका आणि शववाहिकांची सेवा बंद आहे. त्यामुळे गरिबांचे हाल सुरू आहेत. याविषयी विचारले असता महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीच एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. दरम्यान, खासगी रुग्णवाहिकांचे फावले असून अव्वाच्या सव्वा दराने सेवा देत आहेत. अधिकाऱ्यांत ताळमेळ नसल्याने सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 
 
महापालिका पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांना डिझेल मिळण्यात काहीच अडचण येत नसून ही चारचाकी वाहने सुरळीतपणे नेत्यांच्या सेवेत धावत आहेत. याबाबत महापालिका अधिकारी अनभिज्ञ असून, ‘मला काहीच माहीत नाही’, असे म्हणत हात वर करत आहेत. 
 
शासकीय रुग्णालयात रोज सरासरी शहरातील पाच तर इतर रुग्णालयात तीन तर घरगुती दहा अशा १८ जणांचा मृत्यू होतो. यापैकी १० जणांचे निवास स्मशानभूमीपासून लांब असल्याने त्यांना शववाहिकेची गरज असते. पंधरा दिवसापासून सुमारे १५० जणांना शववाहिका मिळाली नाही. त्यांना खासगी शववाहिकेसाठी सुमारे हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागले. मनपाच्या शववाहिका बंद असल्याने दु:खातील सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला. महापालिकेने गरज नसताना रुग्णवाहिका घेतली पण त्यांना डिझेल नसल्याने त्या गाड्या बंद आहे. 

अधिकाऱ्यांच्या गाड्यांना डिझेल तर शववाहिकेला का नाही? 
मनपापरिवहन विभागाने शववाहिकेला डिझेल पुरवठा बंद केला असून अधिकाऱ्यांच्या गाड्या मात्र बिनबोभाट सुरू आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या जीपला डिझेल पुरवठा सुरळीत होतो, तर शव-रुग्णवाहिकांसाठी डिझेल पुरवठा का नाही? असा प्रश्न नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी विचारला. याबाबत महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत म्याकलवार, मनपा आरोग्य अधिकारी डाॅ. जयंती आडके यांना फोन केला असता, एकमेकांकडे बोट दाखवल्याचा आरोप नगररसेवक मिस्त्री यांनी केला. 
 
फलक तांत्रिक कारणाचा, मात्र खरे कारण डिझेल 
महापालिका संसर्गजन्य हाॅस्पिटल येथे शववाहिका असून, तांत्रिक कारणामुळे शववाहिका बंद असल्याचे फलक लावण्यात आले. मात्र खरे कारण डिझेल नसल्याचे आहे. 
 
शहरात फवारणी नाही 
शहरात साथीचे आजार वाढत असल्याने त्यावर प्रतिबंद करण्यासाठी महापालिकेच्या वतीने फाॅगिंग फवारणी करणे आवश्यक आहे. ते केले नाही. याबाबत महापालिका आरोग्य विभाग सुस्तच आहे. 
बातम्या आणखी आहेत...