उस्मानाबाद- तालुक्यातीलसारोळा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने वार्षिक १२ हजार रुपये मदत करण्यात आली. आपचे तालुका संयोजक अॅड. अजित खोत यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षणासाठी १२ हजार रुपये मदत करण्यात येणार आहे.
सारोळा येथील नामदेव पडवळ या शेतकऱ्याने २०१३ मध्ये नापिकीमुळे खासगी आणि बँकांच्या कर्जामुळे निराश होऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे घरातील कर्तापुरुष गेल्यानंतर कुटुंबातील लहान मुलांसह सर्वच सदस्य अडचणीत सापडले होते. शिक्षणासह उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या कुटुबातील मुलाच्या शिक्षणासाठी पहिलीपासून १२ वीपर्यंत शिक्षणाच्या खर्चापोटी दरवर्षी १२ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. सामाजिक संस्थेमार्फत देणगी गोळा करून "आप'च्या वतीने ही मदत करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.१४) सारोळा येथील रोहिणी पडवळ यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी १२ हजारांचा धनादेश देण्यात आला. यावेळी जिल्हा संयोजक प्रा. मारुती कारकर, सचिव अरुण बोबडे, पत्रकार विनोद बाकले, सुदेश देवगिरे, नवनाथ नवगिरे, जयंत रणदिवे, धनाजी शिंदे, प्रकाश कुदळे, कालिंदा जगदाळे, जिजाबाई शिंदे, जिजाबाई कोळगे, कल्पना बाकले, विजयमाला रणदिवे, नाना सूर्यवंशी, प्रकाश कुदळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.