आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्बान हुसेन यांची पत्रकारिता राष्ट्रप्रेम सामाजिक ऐक्याची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्यावरील डॉ. नीलकंठ पुंडे यांचे पुस्तक वाचताना मला सारखी शहीद भगतसिंगांची आठवण येत होती. भगतसिंगांचे स्वत: लिहिलेले लेख डोळ्यासमोर तरळत होते. दोघांमध्ये खूपच साम्य. भगतसिंगांना २४ व्या वर्षी ब्रिटिशांनी फासावर लटकावले तर कुर्बान हुसेनांना २२ व्या वर्षी. भगतसिंगांनी निरनिराळ्या मासिकांत, वृत्तपत्रांत टोपण नावाने लेख लिहिले. कुर्बान हुसेनांनी स्वत:च्या ‘गझनफर’ साप्तहिकातून जागृती केली. तरुण, हिंदू-मुस्लिम ऐक्य, समता-समाजवाद, कामगार हे दोघांचेही आवडीचे विषय या विषयांवर लिहिताना दोघांनीही केलेले चिंतन, केलेला युक्तिवाद, भाषेतील निखारे पाहून अक्षरश: थक्क होते. भगतसिंग पत्रकारांबद्दल लिहिताना म्हणतात, ‘‘वर्तमानपत्रांचे खरे कर्तव्य हे प्रबोधन करणे, लोकांमधील संकुचित भावना दूर करणे, सांप्रदायिक विचार हटवणे, लोकांमधील भाईचारा वाढवणे आणि भारताची राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे हे आहे.”

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे काँग्रेसच्या युवक आघाडीचे एक प्रमुख कार्येकर्ते. स्वातंत्र्यसेनानी डाॅ. अंत्रोळीकरांचे िशष्य. लक्ष्मी-विष्णू गिरणीत कामगार म्हणून काम करत असताना स्वातंत्र्य चळवळीत पुढाकार घेतला म्हणून त्यांची नोकरी गेली. मुस्लिम समाजातील अशिक्षितपणा, कामगारांच्या जीवनातील कष्ट शोषण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. १९२० च्या ‘भीमरावचा संपाचे’ खोलवर परिणाम सोलापूरच्या कामगार जीवनावर झाले होते. त्याच्या चर्चा कामगारांत सदोदित होत, असा तो काळ २५/१०/१९२९ च्या ‘गजनफर’ अंकात ते लिहितात, “तो भीमराव आज कोठे आहे? काही विचारपूस करता त्याची. तो काय खातो, तो जीवंत आहे की मेला, याची साधी चौकशी तरी केलीत काय? तुम्ही मजुरांनी त्याची चौकशी करावयाची नाही तर कोणी? भीमरावचा उजवा हात चांद डावा हात विठ्ठल कवडे यांची तुम्हाला आठवणही होत नाही? अरेरे, ज्यांनी तुमच्यासाठी सगळ्याचा त्याग केला त्यांची तुम्ही आठवणही करू नये? जे इमानाला जागले त्यांना गिरणी मालकांनी रानोमाळ भटकत लावले ज्यांनी नमकहरामी केली ते मालकांचे भीम बनले.”
कुर्बान हुसेनांची भाषा कित्येकदा व्यंगातच वक्रोक्तीपूर्ण अशी होती. परंतु त्यामागील त्यांची तळमळ ही वाचकांना समजणारी होती. फक्त अडीच वर्षे चाललेल्या ‘गझनफर’ साप्ताहिकावर त्यावेळी कामगारांच्या तरुणांच्या उड्या पडत असत. पत्रकारितेच्या माध्यमातून स्वत:च्या समाजाचे शिक्षण, हिंदू-मुस्लिम ऐक्य त्यांनी जोपासले. त्यांची भाषा काही वेळा जळजळीत परंतु भावनांनी ओथंबलेली अशी होती. नगरपालिकेच्या गलथान कारभाराचे त्यांनी वाभाडे काढले. फासावर जाताना मोठ्या धैर्याने ते फासावर गेले. माफीचा साक्षीदार होण्याचा ब्रिटिशांचा प्रस्ताव त्यांनी धुडाकवून लावला. तरुणांमधील सृजनशक्ती राष्ट्रकार्यासाठी चेतवणाऱ्या कुर्बान हुसेन यांच्या जनवादी पत्रकारितेची आठवण सारखी येत राहते.
दंग्यात सांडलेले रक्त ओळखता येत नाही मग भेद का?
हिंदू-मुस्लिमदंग्यात बळी गेलेल्या एका तरुण मुलाच्या विधवा आईचे वर्णन करून ते त्या आईच्या चरितार्थासाठी मदत करण्याचे आवाहन करतात. हिंदू-मुस्लिमांमधील दुहीचा शाप दूर करण्याचे आवाहन तरुणांना करतात. दंग्यामध्ये सांडलेले रक्त हे हिंदूचे आहे की मुस्लिमाचे आहे? हे कोणीही सांगू शकत नव्हते, मग हा भेद का? असा प्रश्न ते विचारतात.
रवींद्र मोकाशी,
डाव्या चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक