सोलापूर- सध्याचा दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे.
आपल्याला वीज, पेट्रोल आणि ऊर्जेचे व्यसन लागले आहे, ते कमी झाले पाहिजे, असे विचार पर्यावरणप्रेमी अरुण देशपांडे यांनी मांडले. वसुंधरा सन्मान पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणावेळी ते बोलत होते.
वसुंधरा महोत्सवाच्या समारोपावेळी रविवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात झाला. सुप्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी व्यासपीठावर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, किर्लोस्कर फेरस युनिट हेड एस. एल. कुलकर्णी, वीरेंद्र चित्राव डॉ. अवचट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी "आमी तुमच्या पिशवीत मावत न्हायी' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी देशपांडे म्हणाले, ""मी निसर्ग व्यसनी माणूस आहे. मी कृषी संशोधनात बराच वेळ घालवला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आपणास वीज पेट्रोलचे व्यसन लागले आहे. या व्यसनापोटी आपली हानी होत आहे. आपण वसुंधरेच्या एका मोठ्या टायटॅनिक जहाजात बसलेले आहोत. त्याला खालून भगदाडे पडलेली आहेत. आपल्या विकासाचा माज याला बुडवण्यासाठी पुरेसा आहे. आता आपल्याला शहराकडून शिवाराकडे जाण्याची गरज आहे.'' श्रुताली नारकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळी झाली निसर्गफेरी
सकाळीसात वाजता विजापूर रस्त्यावरील स्मृती वनात निसर्गफेरी काढण्यात आली. यात पाच शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सिद्राम पुराणिक, डॉ. विक्रम पंडित बाबूराव पेठकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इको लायब्ररी, बोटॅनिकल गार्डन, मृदसंधारणाचा प्रकल्प, बीजबँक, बायोगॅस मॉडेल, वन्यप्राणी पक्षांची माहिती, आयुर्वेद वनस्पती, नक्षत्रवन, निसर्ग परिचय केंद्र, फुलपाखरू उद्यान, चिंचेचं बन, वृक्ष जल मंदिराची माहिती देण्यात आली.
शाळांचा झाला गौरव..
पर्यावरणप्रश्नमंजूषा स्पर्धेतील प्रथम विजेते स. ही. ने प्रशाला, व्दितीय मॉर्डन तृतीय सिध्देश्वर हायस्कूल यांना तसेच विविध विभागांची जबाबदारी असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.
पथनाट्यातूनही सामािजक प्रबोधन
दुपारीदोन ते साडेचारदरम्यान चार पुतळा चौकात पथनाट्याव्दारे शून्य कचरा या विषयावर प्रबोधन करण्यात आले. यावेळी ऋषीकेश कुलकर्णी, गंपा यादवाड, सुभेदार पेठकर, प्रा. देडे, चिदानंद मुस्तारे यांची उपस्थिती होती. यात एस. ई. एस पॉलिटेक्निक, डी. ए. व्ही. वेलणकर, सिंहगड पब्लिक स्कूल, व्ही. व्ही. तंत्रनिकेतन एका स्वतंत्र समूहाने या विषयावर पथनाट्ये सादर करीत स्वच्छ भारत कसा राखता येईल? प्रदूषण कसे कमी करता येईल?, जल, वायू ध्वनी प्रदुषणावर कशी मात करता येईल यावर सादरीकरण केले. कचऱ्याची चुकीची विल्हेवाट, त्याचे दुष्परिणाम, प्रत्येक वस्तू फेकण्यापूर्वी जास्तीतजास्त वापर कसा करावा, असे मुद्दे नाट्य गाण्यातून सादर करण्यात आले.