आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’मागे संकुचित विचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेली दोन वर्षे सत्तेवर आलेले भाजप सरकार फक्त योजनांची घोषणा करीत आहे, प्रत्यक्षात त्याची कोणतीही अंमलबजावणी करीत नाही. स्मार्ट सिटी शहरांची निवड हे त्याचेच उदाहरण असून काँग्रेसचा प्रभाव असलेली शहरे हेरून त्याठिकाणी भाजपचा प्रभाव वाढविण्यासाठी, भाजपला अनुकूल करण्यासाठी शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केल्याचा आरोप खासदार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
 
जगदंबा चौकात महापालिका निवडणुकीचा काँग्रेसच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, महापौर सुशीला आबुटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, धर्मा भोसले यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते. 

गेली ४० वर्षे सोलापूर महापालिका काँग्रेसच्या ताब्यात ठेवून काँग्रेसची ताकद सोलापूरकरांनी वाढविली. यापुढील काळातही अशीच ताकद उभी करण्याचे आवाहन करीत श्री. चव्हाण म्हणाले, ‘मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पंतप्रधान मुख्यमंत्री यांनी केला. मात्र प्रत्यक्षात राज्यात एकही नवीन उद्योग सुरू झाला नाही. उलट नोटाबंदीमुळे लाखो नोकऱ्या गेल्या. उद्योगावर परिणाम झाला.’ 

श्री. शिंदे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या त्या वक्तव्याचा पुन्हा समाचार घेतला. भारतीय जवानांना सोलापुरातून कापड पाठविल्याने टीका केली. सोलापूर शहराच्या विकासासाठी आम्ही केंद्राकडून कोट्यवधी रुपये आणले, विकास कामे राबविली. मात्र मागील अडीच वर्षात केंद्राकडून सोलापूरला एक रुपयाही मिळाला नसल्याचे सांगितले. मागील महापालिका निवडणुकीमध्ये दिलेल्या जाहीरनाम्यातील ७० टक्के कामे पूर्ण केल्याचा दावाही श्री. शिंदे यांनी भाषणात केला. 
 
सेना-भाजपचा भुलभुलय्या 
केंद्रराज्यात भाजप-सेना सत्तेत आहेत. मात्र आज महापालिका निवडणुकीत सेना भाजप विरोधात लढत आहेत. राज्यात सर्व निर्णय मिळून घेत आहेत आणि आता निवडणुकीत एकमेकांवर टीका करीत आहेत. मात्र ही लुटुपुटीची लढाई असून यावर मतदारांनी विश्वास ठेवता ते आतून एकच असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. 
 
प्रयत्न केला पण तुटले 
यंदाच्यामहापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी करण्याचा प्रयत्न केला. पण जमले नाही, अखेर तुटले. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार, लक्ष्मणराव ढोबळे सोलापुरातील सर्व राष्ट्रवादीचे नेते विरोधात होते. काय फरक पडला. काँग्रेसच्याच जागा वाढल्या. यामुळे यावेळी जनता काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...