आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्यामुळेच निघत आहेत मोर्चे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सध्याचे सरकार हे सामाजिक प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळेच राज्यात मराठा, ओबीसी आणि दलित समाजाचे मोर्चे निघत असून सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक हाेत असताना नागरिकांना दोन किलोमीटरवर अडवले जाते. यावरून दोन वर्षांचे हे सरकार अपयशी आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी श्री. चव्हाण हे सोलापुरात आले होते.
श्री. चव्हाण म्हणाले, “हे सरकार लोकाभिमुख नाही. बहुमताच्या जोरावर तगून आहे. मराठा, ओबीसी आणि दलित समाजाच्या प्रश्नांकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. आम्ही सत्तेत असताना सामाजिक प्रश्न तत्काळ सोडवत होतो. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाला नाही. आता सरकार प्रश्न चिघळू देत आहे. हे सरकारचे अपयश आहे. सरकारी धोरण आखणे आवश्यक असताना ते केले जात नाही. अॅट्राॅसिटी कायदा राहिला पाहिजे.’

यावेळी आमदार प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, प्रकाश पाटील, धर्मा भोसले, विश्वनाथ चाकोते, नलिनी चंदेले, निर्मला ठोकळ, संजय हेमगड्डी आदी उपस्थित होते.

दिवाळीआधी द्या नुकसान भरपाई
मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. पिकांचे पंचनामे करून दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

सैन्याच्या कामाचे कौतुकच
उरी आणि पठाणकोट हल्ल्यानंतर उशिरा का होईना सरकारने पाकिस्तानात जाऊन कारवाई केली. सैन्याने केलेल्या कामाचे कौतुक केले पाहिजे. देश एकत्र राहिला पाहिजे. यावर राजकारण होऊ नये. आम्ही सरकारसोबत अाहोत. तसे वक्तव्य काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. सर्जिकल आॅपरेशन यापूर्वी झाले. पण ते जनतेसमोर आणले नाही.

बातम्या आणखी आहेत...