सोलापूर - सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे या मागणीसाठी महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पुकारण्यात आलेला बेमुदत संप ५१ टक्के वेतन लागू करण्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला. महापालिका पदाधिकारी, अधिकारी परिवहन कामगार संघटनेच्या बैठकीत अडीच तासाच्या चर्चेनंतर तोडगा निघाला. संपूर्ण वेतन आयोग लागू करण्यापेक्षा ५१ टक्के देण्याचे मान्य झाले. त्यानुसार ऑक्टोबरपासून वेतन देण्यात येईल. या निर्णयामुळे परिवहनच्या तिजोरीवर दरमहा २२ लाखांचा बोजा पडणार आहे. दरम्यान सकाळपासून पुकारण्यात आलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल झाले.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली होती. मंगळवारी सकाळपासून एकही बस रस्त्यावर धावली नाही. आज सकाळी महापौर कक्षात या विषयावर बैठक झाली. तब्बल दोन तास झालेल्या चर्चेनंतर ५१ टक्के वेतन वाढ करण्याचे ठरले. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. महापौर कक्षात झालेल्या बैठकीस महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, स्थायी सभापती पद्माकर काळे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, परिवहन सभापती सलीम सय्यद, नगरसेवक चेतन नरोटे, दिलीप कोल्हे, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील आदी उपस्थित होते. दुपारनंतर सिटीबस रस्त्यावर धावू लागल्या.