आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एटीएम’चे अक्षरश: दिवाळे, पैशाविना केंद्रे बंद, ग्राहकांची मात्र धावाधाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दिवाळीअसल्याने शहरातील ‘एटीएम’ केंद्रांतून मोठ्या प्रमाणात रकमा काढण्यात आल्या. बँकांना असलेल्या सुट्यांमुळे या केंद्रांत पुरेशी रक्कम भरण्यात आली नाही. त्यामुळे पैशाअभावी अनेक केंद्रे बंद होती. पाडवा, भाऊबीजेला ग्राहकांना धावाधाव करावी लागली.
राष्ट्रीयीकृत, खासगी आणि व्यावसायिक बँकांच्या ‘एटीएम’मध्ये शुक्रवारी दुपारपर्यंत खडखडाट होता. कुठे शटर अर्ध्यावर आेढले होते, तर कुठे मशीनवरच ‘बंद’ असल्याचा फलक लटकत होता. शुक्रवारीही बाजारात खरेदी सुरूच होती. बहिणीला भेट देण्यासाठी सोने, मोबाइल खरेदीची धूम झाली.

साड्यांच्या दुकानांतही ग्राहकांची मोठी गर्दी होती. परंतु ‘एटीएम’ बंद असल्याने त्यांच्या पुढे अडचणी आल्या. त्यामुळे जिथे ‘एटीएम’ कार्डवरूनच पैसे जमा करून घेण्याची सुविधा आहे, तिथे ग्राहकांनी धाव घेतली. त्यामुळे मोठ्या सराफ पेढ्या ग्राहकांनी फुलून गेल्या होत्या.
दिवाळीच्या सुट्या संपवून शुक्रवारी रात्री सोलापूरकर पुणे, मुंबईकडे निघाले. रेल्वेस्थानकावरील एटीएम केंद्रेही बंदच. रात्री वाजता पैशांचा भरणा सुरू होता. बाहेर मात्र रांग लागली होती.
^ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेच्या एटीएम केंद्रावर पैसेच नव्हते. हैदराबाद रस्ता ते कन्ना चौकपर्यंत प्रवास झाला. शेवटी साखर पेठेतील ‘एचडीएफसी’ केंद्रातून पैसे मिळाले.'' लक्ष्मणआकेन, ग्राहक

खडखडाट कशासाठी?
‘एटीएम’केंद्रांमध्ये पैसे भरण्याची यंत्रणा खासगी आहे. पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था संबंधित एजन्सीने करायची असते. सलग सुट्या आल्या, की एजन्सी आणि ग्राहकांमध्ये समन्वय राहत नाही किंवा एजन्सी गांभीर्याने पाहत नाही. परिणामी एटीएम केंद्रांत खडखडाट निर्माण होतो.

शुक्रवारी सकाळी अकरानंतर पैशांचा भरणा झाला. शुक्रवारी बँका सुरू असल्याने पैशाअभावी केंद्रे बंद असे होऊ शकत नाही. नेमके काय झाले, हे यंत्रणेशी बोलल्यानंतरच कळेल.'' संजयवाघ, बँक ऑफ महाराष्ट्र

रोज १५ कोटींचा भरणा
एका‘एटीएम’मध्ये १५ लाख रुपयांचा भरणा करण्यात येतो. शहरातील १०० केंद्रांतून दररोज १५ कोटी रुपये भरले जातात. या रकमा एरवी एकाच दिवशी काढण्यात येत नाहीत. परंतु महत्त्वाचे सण आल्यास पैसे काढण्याचे प्रमाण वाढते. दिवाळीत असे कोट्यवधी रुपये दररोज काढले जातात.