आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम : मृगात दमदार पावसाची हजेरी; खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लोहारा - सलगवर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने लोहारा तालुक्यातील बळीराजावर मोठे संकट ओढ़ावले होते. परंतु, गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तसेच यावर्षीही चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पावसाच्या हजेरीनंतर पेरणीसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. यासाठी बियाणे, खत खरेदीकरीता दुकानांमध्ये गर्दी होत असून सर्वत्र पेरणीची लगबग दिसून येत आहे. 
 
लोहारा तालुक्यातील शेती व्यवसाय पाणीप्रश्न केवळ पावसावर अवलंबून आहे. मागील वर्षापासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळून त्यांचे अर्थकारण बिघडले होते. तरीही चांगला पाऊस होईल आपली परिस्थिती सुधारेल या आशेवर शेतकरी शेती व्यवसाय करत आहेत. त्यातच गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यावर्षीही चांगला पाऊस होईल या वेधशाळेच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. लोहारा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५४,१०८ हेक्टर आहे. यापैकी ४८,५२७ हेक्टर क्षेत्र लागवडीचे आहे. त्यातील खरीप हंगामाचे क्षेत्र ३७,९०३ हेक्टर आहे. खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, तूर, मूग, सूर्यफूल, तीळ, भुईमूग, खरीप ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी केली जाते. तालुक्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीनचे पीक घेण्यावर भर देतात. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सोयाबीनचे सरासरी क्षेत्र हजार हेक्टर आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र १२,९७७ हेक्टरवर पेरणी होते. तुरीचे सरासरी क्षेत्र ३७०० हेक्टर आहे परंतु, प्रत्यक्षात ५४३७ हेक्टरवर पेरणी होते. तसेच मूग पिकांचे सरासरी क्षेत्र ६०० हेक्टर आहे. परंतु हजार हेक्टरवर पेरणी होते. याउलट तालुक्यातील बाजरीचे सरासरी क्षेत्र १२०० हेक्टर आहे. परंतु प्रत्यक्ष ४९५ हेक्टर इतकी पेरणी होते. यावर्षी सोयाबीन तुरीची पेरणी १० टक्के कमी तसेच उडीद मुगाची पेरणी १० टक्के जास्त होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 
 
पेरणी संदर्भात कृषी विभागाच्या सूचना :पेरणी करताना मूग, सोयाबीन, उडीद, तूर या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांवर भर द्यावा. घरगुती बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता तपासावी त्यावर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. तसेच कृषी केंद्रातील बियाणे खरेदी करताना बियाणाची बॅग फुटलेली नसावी, त्याचे लेबल आहे का याची खात्री करूनच बियाणे खरेदी करा, पक्या पावतीची मागणी करा पावती तसेच बॅग जपून ठेवा. थोडेसे बियाणांचे नमुनेही शिल्लक ठेवा, असे तालुका कृषी अधिकारी एन. एन. मगर यांनी सांगितले आहे. 
 
खतेबी- बियाणे उपलब्ध : लोहारातालुक्यात खरीप हंगामासाठी पुरेशा खताची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे खरीप हंगामातील खते बियाणे सध्या कृषी केंद्रात उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. 

गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक 
खते,बी-बियाणे विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वजन माप निरीक्षक यांचा समावेश राहणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...