आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेव्ह नेचर’तर्फे लोकप्रबोधन यंदा वाटणार ५० हजार पत्रके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिध्देश्वर घाटाजवळ दररोज सकाळी वॉकिंग करणाऱ्यांची गर्दी खूप असते. चार वर्षांपूर्वी असेच वॉकिंग करताना एक ग्रुप तयार झाला आणि या ग्रुपमध्ये फटाक्यांच्या दुष्परिणामाविषयी चर्चा सुरू झाली. त्यातील काहीनी आपण माेहीम राबवायची का, असा प्रश्न उपस्थित केला आणि त्या ग्रुपने लगेच होकार दिला. इथून सुरू झाली चर्चा. चर्चेला प्रत्यक्षात स्वरूप देण्यासाठी “सेव्ह नेचर’ ही संघटना चार वर्षापूर्वी स्थापन करण्यात आली. यामध्ये सर्वत्र सदस्य अध्यक्ष असून कोणीही प्रसिध्दीसाठी धडपडणारे नाहीत हे विशेष.
लोकप्रबोधनाची गरज संघटनेला वाटली. त्यामुळे प्रथम फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम सांगणारी माहिती पत्रकं वाटण्यात आली. प्रथम दहा हजार माहिती पत्रके शाळा, कॉलेज, सोसायटी, दवाखाना या ठिकाणी वाटण्यात आली. दुसऱ्या वर्षी १५, तिसऱ्या वर्षी २५ आणि चौथ्या वर्षी यंदा ५० हजार पत्रके वाटत आहेत.

शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. नव्वद शाळांमध्ये शिक्षकांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्यार्थंाना दिली. ब्यूटी पार्लरच्या संघटनेने पुढाकार घेतला. शहरात ५५० ब्यूटी पार्लर सेंटर असून प्रत्येक ठिकाणी शंभर माहिती पत्रके ठेवण्यात आली आहेत. अनेक डॉक्टरांकडून पत्रकाची मागणी होती आहे. काही दानशूर व्यक्तींनी स्वखर्चाने माहिती पत्रके छापून दिली. सोसायटी, अपार्टमेंटमधील प्रत्येक घरात जाऊन पत्रके दिली जातात. आता अनेक सोसायट्यामधून पत्रकाची मागणी होत आहे.

असे केले नियोजन
सेव्हनेचरमध्ये पहिल्या वर्षी मोजकेच सदस्य होते. प्रत्येकी चार सदस्यांचे चार ग्रुप केले. शाळा, शासकीय कार्यालय, पेठा, सोसायटी येथे पाठवले. केवळ माहिती पत्रक वाटप करता लोकांशी संवाद साधला. दरवर्षी असाच उपक्रम ठेवला. व्याप्ती वाढवली. नि:स्वार्थी कार्य पाहून अनेकजण जोडले गेले. आज संघटनेत १३० सदस्य असून यंदा पन्नास हजार माहिती पत्रके वाटली जात आहेत. यंदा संघटनेने हे अभियान वर्षभर राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी संघटना राजकीय नेते, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांची भेट घेणार आहे.

जि. प. शाळा दिंडूर येथे प्रतिज्ञा
फटाकेमुक्तदिवाळीची दिव्य मराठीतील बातमी वाचून दक्षिण सोलापूर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा दिंडूर येथे फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण होते, पक्षी घरटे सोडून जातात, आजारी व्यक्ती नवजात बालकांना त्रास होतो अशी माहिती बालाजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिली. फटाकेमुक्त दिवाळी करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. अध्यक्षस्थानी रमेश तळलीकर होते. यावेळी सरपंच रामचंद्र तूपसाखरे, परमेश्वर हुक्के, पंडित करजगे, नागनाथ शिवयोगी आदी मान्यवर उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...