आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Ambedkar Birth Anniversary Celebration

१२५ व्या जयंती उत्सवाचा जल्लोष मिरवणुकीत दिसणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती साजरी होत असल्याने भीमप्रेमी जनतेत प्रचंड उत्साह आहे. सोलापुरातील जयंती उत्सव मिरवणूक आजपर्यंत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवूनच साजरी करण्याची परंपरा आहे. यंदाही कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव मिरवणूक काढण्यात येईल, असा विश्वास डाॅ. आंबेडकर मध्यवर्ती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील सरवदे यांनी व्यक्त केला.
आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरवदे यांच्याशी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी संवाद साधला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर आज देश चालतो आहे. आम्ही या कायद्याचा आदर करत आलोय, करतोय आणि करणार. डॉ. बाबासाहेबांची जयंती नेहमी मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरी केली जाते. पूर्वी जयंती मिरवणूक ही बैलगाडीतून निघत. यानंतर टॅक्टरद्वारे निघत गेली. आता कंटेनरवर देखावे सादर करून काढली जात आहे. पूर्वी वाद्यही असायचे आणि आताही आहेत. आधुनिकतेमुळे यात फरक पडत गेला. मात्र जी गोष्ट कायद्यात बसत नाही ती करणारच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून डॉल्बी हे वाद्य आहे. मात्र आता याचे प्रमाण कमी झाले आहे. काही वर्षांपूर्वी १५-१६ बेसची डॉल्बी सिस्टिम वापरण्यात येत. मात्र कायद्यानुसार आता ते कमी कमी होत गेले. सध्या दोनच बेस वापरावे आणि मर्यादेतच डेसिबल ठेवावे, असे आवाहन आम्ही सर्व मंडळांना केले आहे, असेही ते म्हणाले.

पोलिस शत्रू नव्हे मित्र आहेत
पोलिस आपले शत्रू नसून मित्र आहेत. त्यासाठी त्यांना समजून घेणे आणि मदत करणे गरजेचे आहे. समाजात परिवर्तन एका दिवसात होत नसते. टप्प्याटप्प्याने होईल. जयंती उत्साहात साजरी होईल. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून. यंदाची मिरवणूक दुपारी बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निघणार आहे. शहरात एकूण ४५० मंडळे असून मिरवणुकीत १५० मंडळांचा सहभाग असणार आहे. रविवारी दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत ही मिरवणूक असणार आहे. कायदा काय म्हणतो, नियमावली काय आहेत याबाबत आम्ही सर्व मंडळांना समजून सांगतोय. तसेच याबाबत माहिती देणारे िडजिटल लावण्याचा विचार आहे, असे मत सरवदे यांनी व्यक्त केले.

वाहतुकीला नागरिकांना त्रास होणार नाही
जयंती मिरवणूक काढताना वाहतुकीला अडचण होऊ नये याकरिता प्रयत्न राहणार आहेत. तसेच या विषयी उपाययोजना करण्यास वाहतूक पोलिस शाखेबरोबर बसून नियोजन करण्यात येणार आहे. मिरवणुकीत कोणालाही त्रास होऊ नये यासाठी लहान मंडळांना पुढे आणि मोठ्या देखाव्याचे मंडळ मागे राहणार आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे नियोजन करण्यास आम्ही महापौर सुशीला आबुटे यांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी फिरते शौचालय आणि रस्त्यावरचा कचरा उचलण्यास घंटागाड्यांची सोय करण्याची विनंती केली आहे. तसेच रविवारी २४ एप्रिल रोजी पोलिसांनी मद्य विक्रीस परवानगी देऊ नयेे, असे आवाहन करण्यात आले आहे.