आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासन फक्त भपकेबाज अन् मोठ्या घोषणा करणारे; आमदार बच्चू कडू यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जलयुक्तशिवार योजनेबाबत आम्हाला दुमत नाही. पण, त्यामध्ये गैरप्रकार सुरू आहेत. मोठ्या घोषणा भपकेबाजपणा करून फक्त घोषणा करणारे हे सरकार आहे, अशा शब्दात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी टीका केली. 

आमदार कडू यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यानिमित्त ते मंगळवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वी राज्यात १५ वर्षे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी ठोस कृती योजना राबवल्या नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कृषिमंत्री असतानाही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर या दोन्ही पक्षांनी संघर्ष यात्रा काढली. 

वास्तविक या दोन्ही पक्षांच्या विरोधात संघर्ष करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर प्रहार संघटना आमच्या स्टाइलने आंदोलन करण्यास सज्ज आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे प्रश्न आहेत. येथील अडचणींबाबत अभ्यास करून अधिकारी आणि मंत्रालयात पाठपुरावा करण्यात येईल. आजवर शेतकरी आणि कामगार सत्तेपासून कोसू दूर राहिला आहे. सगळीकडेच प्रचंड विषमता दिसून येते. सामान्य माणसांसाठी सरकार पुढे येताना दिसत नाही. शिक्षणासाठी दोन-तीन लाख रुपये फी आकारली जात आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यात मात्र जात आणि धर्म आहे. 

शेतकरी हे फक्त शेतकरी म्हणून जगले पाहिजेत. जात, धर्म, मंदिर-मशिदीतच राहिले पाहिजेत. मात्र जात पाहून मतदान होतेय, ही लोकशाहीची शोकांतिका आहे. मागील ७० वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी शेतकरी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. जीएसटीमुळे आर्थिक सुबत्ता येईल, पण त्या पैशाचे योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. राज्यात १३ हजार रुपये क्विंलटने यापूर्वी शेतकऱ्यांची तूर विक्री झाली. तोच भाव अवघ्या साडेतीन ते चार हजार रुपयांवर आला आहे. शेती उत्पादित मालांचा अत्यंत तुटपुंजा दर मिळत असताना हमीभावाने तूर खरेदी केल्याचा कांगावा करीत शेतकऱ्यांची लूट शासनातर्फे सुरू आहे.” या वेळी प्रहार संघटनेचे अतुल कुपसे-पाटील, सतीश निळे, बशीर तांबोळी, अमोल यादव, अण्णा जाधव, नीलेश पवार आदी उपस्थित होते. 

कांबळे यांची गाडी काळी करणार 
सामाजिकन्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अपंगांना ६०० वरून एक हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन आम्हाला दिले होते. मात्र, त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही. त्यामुळे याचा निषेध म्हणून आम्ही राज्यमंत्री कांबळे यांच्या गाडीला काळे फासणार आहोत. तसेच, शिक्षण शुल्क कायद्यानंतरही मुंबईत विद्यार्थ्यांकडून मोठी फी वसूल करण्यात येते. मंत्रालय असणाऱ्या शहरामध्येच विद्यार्थ्यांची लूट सुरू असताना मुख्यमंत्री शिक्षणमंत्री करतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढील काळामध्ये आरोग्य शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला. 

दानवे भेटतील तेव्हा... 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात काढलेल्या वक्तव्यावर बोलताना कडू म्हणाले, त्यानंतर ते आम्हाला भेटले नाहीत. जेव्हा केव्हा भेटतील तेव्हा त्यांना आम्ही चोपून काढू. यापुढे आम्ही काहीही सहन करणार नसल्याचेही आमदार कडू यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...