सोलापूर- बहुजन समाज पक्षाने गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी साडे बाराच्या सुमारास पदयात्रा निघाली. पांजरापोळ चौकातील शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, चार हुतात्मा आणि डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात दाखल झाले. गुरुवारी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
पदयात्रेत पुरुषांबरोबर महिलांचाही समावेश होता. नागरिकांनी हातात निळा, हिरवा, पिवळा आणि भगवे झेंडे घेतले होते. काही तरुण तरुणींच्या हातात पक्षाचे चिन्ह असलेले पोस्टर होते. पदयात्रेत काही मुलींनी नृत्य केले. पदयात्रेत पदाधिकाऱ्यांनी निळे, पिवळे भगवे फेटे परिधान केले होते.
प्रभाग पाचमधून आनंद चंदनशिवे, स्वाती आवळे, गणेश पुजारी, ज्योती दमगुंडे यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्र. मधून नितीन बंदपट्टे, तर सहा मधून अमरसेन साळवे रसिद सरदार शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी प्रदेश महासचिव अॅड. संजीव सदाफुले, अप्पासाहेब लोकरे, सुरेश सुरडे, देवा उघडे, अशोक जानराव, जनार्दन शिंदे, समाधान आवळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.