आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजीराव विहिरीजवळ रंगला रिंगण सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूरच्या दिशेने जात असलेल्या ज्ञानेश्वर माउली पालखी, तुकाराम महाराज पालखी आणि सोपानकाका पालखी सोहळ्यांचे रिंगण ऐतिहासिक अशा बाजीराव विहिरीजवळ शनिवारी दुपारच्या वेळी रंगले.
‘भाग गेला, शीण गेला अवघा झालाचि आनंद’ या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांच्या अमाप उत्साहात रिंगण सोहळा रंगला.

ज्ञानेश्वरमाउलींचे उभे रिंगण
भंडीशेगावमधीलमुक्काम आटोपून वाखरीकडे निघालेल्या माउलींच्या पालखीचे दुसरे उभे रिंगण शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाले. बाजीराव विहीर परिसरात लाखो वारकऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. माउली पालखीच्या चोपदारांनी रस्त्यावर उभे रिंगण लावले. माऊली आणि पालखीच्या स्वाराचा अश्व उभ्या रिंगणात वेगाने जात असताना हजारो वारकऱ्यांनी अश्वाच्या दिशेने खारका उधळल्या. ज्यांना खारका मिळाल्या त्यांनी प्रसाद म्हणून त्या खारका घेतल्या. भाविकांनी माउली माउली नामाचा जयघोष केला. उभ्या रिंगणानंतर माउलींची पालखी खांद्यावर घेऊन गोल रिंगणासाठी शेजारील मोकळ्या मैदानात नेण्यात आली. शेजारच्या शेतात नेण्यात आली. येथे पालखी सोहळ्याचे चौथे अखेरचा गोल रिंगण सोहळा सायंकाळी चारच्या सुमारास रंगला. तत्पूर्वी मैदानाजवळ हुतुतू, सूरपाटींचा खेळही रंगला. उद्या वाखरी येथे (रविवारी) ज्ञानेश्वर माउली पालखीचे शेवटचे मोठे उभे रिंगण होईल.
बाजीराव विहीर परिसरात विविध खेळ रंगले. यात सूरपाट्या खेळण्याचा आनंदही लुटण्यात आला. शीण गेला, भाग गेला या उक्तीमुळे चालून चालून थकलेले वारकरी पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यास पुन्हा ताजेतवाने झाले.
बाजीराव विहिरीजवळ संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा पाहण्यासाठी जमलेले वारकरी बांधव.

माउली पालखी मार्गावर पोलिस खात्याच्या नियोजनाचे कौतुकच
संतज्ञानेश्वर पालखी मार्ग हा तुलनेने अरुंद असला तरी सोलापूर पोलिसांनी उत्तम नियोजन केले, असे मत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे प्रमुख राजाभाऊ चोपदार यांनी व्यक्त केले. पंढरीतील वाळवंटातील स्वयंपाक करण्याच्या बंदीबाबत तोडगा निघेल, समन्वयातून मार्ग निघेल, कार्तिकी सोहळ्यापर्यंत हे होईल, अन्यथा न्यायालयीन लढा लढण्यात येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

काकांच्या पालखीचे उभे रिंगण
माउलींच्यारिंगण सोहळ्यापूर्वी बाजीरावची विहीर परिसरात संत सोपानकाकांच्या पालखीचा उभा रिंगण सोहळा रंगला. या सोहळ्यालाही वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. चोपदारांनी उभे रिंगण लावले. दोन्ही बाजूला टाळकरी, झेंडेकरी यांनी ताल धरला होता. अश्वाने वेगाने धावत रिंगण पूर्ण केले. असंख्य वारकऱ्यांनी रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वाच्या टापाखालील डांबरी रस्त्यावरची धूळ मस्तकी लावली.

बाजीराव विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व
आयताकृती,भली मोठ्ठी बाजीराव दगडी विहीर आकर्षणाचे केंद्रबिंदू होती. पहिले बाजीराव पेशवे यांच्या स्मरणार्थ अहिल्यादेवी होळकर यांनी ही विहीर बांधली आहे. याच उभे रिंगण गोल रिंगणाचा सोहळा असतो. जणू रिंगण मेळाच. यामुळे बाजीराव विहीर ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनली आहे.

कमरेवरचेहात सोडुनी आभाळाला लाव तू,
ढगाला थोडे हलवून, भिजव माझा गाव तू

याकवितेसारखीच भावना पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या असंख्य वारकऱ्यांची झाली आहे. जुलै संपत आता, पावसाचा टिपूस दिसत नाही. पावसाची आशा दाखविणारे ढग वाकुल्या दाखवून पुन्हा निघून जात आहे. ऊन -सावलीचा खेळ सुरूच राहिला आहे. पाऊस पडंना, जित्राबांचं हाल बघवंना, चारा नाही, प्यायला पाणी नाही, वारीत मन विठ्ठलाच्या ओढीनं रमलंय खरं पण पावसाचा विचार मनातून जात नाही. त्यामुळेच पाव्हणं कोंच्या गावाचे तुम्ही, असे विचारणारे भाविक फकस्त पावसाचा विषय काढू नका राव, अशी विनवणी एकमेकांना करताना आढळून आले.

बाजीरावच्या विहिरीत डोकावून पाहिले तरी पाण्याचा टिपूस दिसत नव्हता. खोल खोल खाली पाण्याचे इवलेसे तळे दिसत होते. त्यापेक्षा मोठे तळे डोळ्यातून सांडत होते. बाजीराव विहिरीच्या आसपास डेरा टाकून असंख्य वारकऱ्यांना आपल्या वावरातील विहीरच आठवली. एकेकाळी या विहिरीसारखे पाणी आपल्याबी विहिरीला होते, आज आपली विहीरही बुजत चालल्याचे दु:खच डोळ्यातून दिसत होते.

खारका मारण्यावर उपाय
बाजीरावविहीर येथे रिंगण सोहळ्यावेळी अश्वाला तसेच पालखीवर खारका मारण्यावर प्रतिबंध करण्यात आला होता. खारका विक्रीच होऊ नये यावर प्रभावी उपाययोजना करण्यात आली. यामुळे खारका उधळण्याचे प्रमाण चांगलेच आटोक्यात राहिले. खारका मारण्याच्या प्रघातामुळे अनेक भाविकांना टेंगूळ उठायचे. यंदा मात्र खारका फेकून मारल्या गेल्या नाही.