आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालनाट्य संमेलन: नाट्यकला आत्मसात करा, फय्याज यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : बालनाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाश यलगुलवार, विजय साळुंके, अभिनेते मोहन जोशी, फय्याज, संमेलनाध्यक्षा कांचन सोनटक्के, महापौर सुशीला आबुटे, अजय दासरी आदी.
सोलापूर - नाटकाची कला ही विद्यार्थी दशेतच आत्मसात केली तर ती विद्यार्थांना सक्षम बनविते, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज यांनी व्यक्त केले. (कै.) बाळासाहेब ठाकरे नगरीत (हरिभाई देवकरण प्रशालेचे प्रांगण) पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या मुख्य सोहळ्याचे प्रचंड उत्साहात उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रंगमंचावर संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के, महापौर सुशीला आबुटे, अभिनेते मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, भाऊसाहेब भोईर, संमेलनाचे कार्यवाह अजय दासरी, प्रकाश यलगुलवार, दिलीप कोरके, लता नार्वेकर तसेच विशेष बाल अतिथी म्हणून दृष्टीहीन विद्यार्थिनी नितिना वड उपस्थित होते. नटराजाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच भिरभिरे देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
फय्याज म्हणाल्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी नाट्यकला महत्त्वाची भूमिका बजावते. ही चळवळ पुढे नेण्याचे काम आता सुरू झाले आहे. त्याचे काम आता थांबता कामा नये. हरिभाई देवकरण शाळेत माझ्यावर नाटकाचे संस्कार झाले. त्यातून मी घडत गेले. त्याच माझ्या शाळेत पहिला बालनाट्य संमेलनाचा सोहळा होत आहे. याचा मला खूप अभिमान आहे. यावेळी फय्याज यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
बालनाट्याची चळवळ पुढे नेणार असल्याचा निर्धार मोहन जोशी यांनी व्यक्त केला. तसेच संमेलनाध्यक्षा कांचन सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले. विजय साळुंके यांनी अडचणी आल्या तरी सोलापूरकरांच्या सहकार्याने संमेलन यशस्वी झाले असे सांगितले. तर अजय दासरी यांनी प्रणिती शिंदे यांचे तर कृष्णा हिरेमठ यांनी विनोद तावडे यांचे भाषण वाचून दाखविले.
दरवर्षी बालनाट्य संमेलन
बालनाट्यसंमेलनाची चळवळ सुरू झाली असून दरवर्षी संमेलन घेण्यात येणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याची जाहीर घोषणा ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा फय्याज यांनी केली. शिवानी जोशी, उत्तरा मोने यांनी सूत्रसंचालन केले. अमोल धाबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या शेवटी रघुनाथ गड्डम यांच्या शिष्यांनी नटराज वंदन भरत नाट्यममधून सादर केले.
मान्यवरांची दांडी
स्वागताध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार सुभाष देशमुख, सिद्धाराम म्हेत्रे, दीपक साळुंखे, भारत भालके आदींना आमंत्रण देऊनही संमेलनाला दांडी मारली.