आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालनाट्य संमेलन : समारोपात रंगले ‘वस्त्रहरण’, त्याला फक्त पैशाचे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात झालेल्या पहिल्या बालनाट्य संमेलनाच्या समारोप सत्रात ‘वस्त्रहरण’ नाट्य चांगलेच रंगले. तेही ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांच्या साक्षीने. कारण होते, संमेलनासाठी निधीचे. कालपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरवली होती. रविवारी अचानक खासदार विजयसिंह मोहिते रंगमंचावर आले. त्यांच्या मागे आमदार सुभाष देशमुख हेही हजर झाले. दोघांकडून निधीची घोषणा होईल, अशी संयोजकांना अपेक्षा होती. परंतु रंगले ‘वस्त्रहरण’ नाट्य. त्यात महापौर सुशीला आबुटे याही सहभागी झाल्या. एकमेकांकडे बोट दाखवत या तिघांनीही संयोजकांची निराशा केली.

खासदार मोहिते एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते. संमेलनाचे निमंत्रक विजय साळुंके यांनी त्यांना येण्याची विनंती केली. त्यामुळे ते मंचावर आले. साळुंके यांनी प्रस्तावनेत यशस्वी संमेलनाची गाथा सांगत, लोकवर्गणीतून पैसे येत आहेत म्हणून संमेलन झाले. परंतु उद्यापासून काय करायचे? लोक पावत्या घेऊन येतील. त्यांना काय उत्तरे द्यायची? निधीसंदर्भात कोणीच काही बोलत नाहीत. माझ्या पाठीशी केवळ पत्रकार होते. त्यांनी या संमेलनाची उंची वाढवली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सहभाग देऊन भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली. पण झालेला खर्च? कुठून पैसे आणायचे? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर खासदार, आमदार आणि महापौरांनी एकमेकांकडे बोट दाखवले.

...तर १० लाख रुपये देईन
महापौर चषकासाठी राज्य शासनाकडून ५५ लाख रुपये मिळायचे आहेत. ही रक्कम आमदार देशमुख यांनी मिळवून दिली की, साळुंकेंना १० लाखांचा धनादेश लगेच देईन. तोपर्यंत देशमुख यांनी स्वत:च्या निधीतून १० लाख द्यावेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे सोलापूर स्मार्ट सिटी करू. सुशीला आबुटे, महापौर

विजयदादा ज्येष्ठ आहेत
मोहिते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे कोणी ऐकणार नाही, असे होणार नाही. सरकारकडे मागणीसाठी सगळेच जात असतात. खास बाब म्हणून अख्खा आमदार निधी देण्यास मी तयार आहे. पण स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरला पहिल्या स्थानावर नेण्याचे काम महापौरांनी केले पाहिजे. सुभाष देशमुख, आमदार

देशमुखांना सहकार्य करू
देशातील पहिले बालनाट्य संमेलन सोलापुरात होतेय, याची माहितीच नव्हती. साळुंके यांनी बोलवले म्हणून आलो. निधी देण्यासाठी मी काही सत्तारूढ पक्षाचा खासदार नाही. सुभाष देशमुख यांनी शासनाकडे प्रयत्न केले तर त्यांच्या पाठीशी उभे राहीन. महापौरताईंनी मदतीसाठी पुढे यावे. विजयसिंह मोहिते, खासदार