सोलापूर - ज्येष्ठ साहित्यिक सदांनद देशमुख यांनी मराठीतून लिहिलेल्या बारोमास या कादंबरीवर हिंंदीतून चित्रपट निर्मिती करण्यात अाली अाहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारपासून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत अाहे.
शेतकऱ्यांसमोर सध्या अनेक कडवी अाव्हाने दुष्काळाने उभी केली अाहेत. नापिक जमीन, अपुरा पाऊस, महागाई, भ्रष्टाचार, सावकारी पाश अशा अनेक संकटांचा शेतकरी सध्या सामना करतो अाहे. ही संकटे काय अाहेत, त्यावरील उपाय काय अाहेत याची चर्चा करणारी वास्तववादी मांडणी हिंदीतून या चित्रपटाद्वारे करण्यात अाली अाहे. फिल्मची निर्मिती पेल्लुपुरम साजिथ प्रियंका सूद यांनी केली अाहे. शेतकरी अात्महत्येला कारणीभूत असलेले विषय यातून समोर अाणण्यात अाले अाहेत. धीरज मेश्राम हे चित्रपटाचे दिग्दर्शक अाहेत.
गीत संगीत रवींद्र जैन तर राहुल रानडे, सौरभ भालेराव यांनी पार्श्वसंगीत दिले अाहे. तपन व्यास छायादिग्दर्शन, तर सरोज खान यांचे नृत्य दिग्दर्शन अाहे. संकलन नवनिता सेन दत्ता, ध्वनी अनमोल भावे, साहसदृष्ये पी. के. स्वेन यांची अाहेत. चित्रपटात सीमा विश्वास, बेंजामीन गिलानी, सुब्रत दत्ता, देविका दफ्तरदार, जतीन गोस्वामी, सुधीर पांडे, अबीब अाझमी, बच्चन परेरा, रोहित पाठक अादींच्या भूमिका अाहेत.
नातेसंबंधातून कुटुंबाचे उसवलेपण
बारोमासही कादंबरी केवळ शेती शेतकरी यांच्यापुरती मर्यादित नसून एका शेतकरी कुटुंबातील अाई, वडील, भाऊ, मुले यांच्यातील अनेकांगी नातेसंबंध अधोरेखित करणारी अाहे. अार्थिक, सामाजिक विषमतेमुळे शेतकरी कुटुंबाला काय काय सहन करावे लागते, त्यामुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते, असे कथानक या चित्रपटाचे अाहे. चित्रपटातील नायक ज्या समस्यांना सामोरे गेला अाहे, तोच अनुभव स्वत: देशमुख यांनी काही प्रमाणात घेतला अाहे. पटकथा धीरज मेश्राम यांचीच असून संवाद या दोघांनी तयार केले अाहेत.