आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बार्शीत नगराध्यक्षपदासह २९ जागांवर सेनेची सत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - नगरपालिकेच्या निवडणुकीत १० वर्षांनंतर सत्तांतर घडले. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नगराध्यक्षपद आणि २० प्रभागांतील ४० पैकी २९ जागा जिंकत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. ३७ जागा लढवलेल्या भाजप व मित्रपक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. नगराध्यक्षपदाच्या सामन्यात शिवसेनेचे अॅड. आसिफ तांबोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत कथले यांचा २४६८ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे “मिशन परिवर्तन’ यशस्वी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

साेमवारी मतमोजणीवेळी सुरुवातीपासूनच चुरस असल्याचे दिसले. प्रभाग एक, दोन व तीनमध्ये राष्ट्रवादीने सलग विजय मिळवला. त्यानंतर प्रभाग चार, पाच, सहामध्ये बाजी मारत शिवसनेेने बरोबरी साधली. सातमध्ये शिवसेनेला एक, राष्ट्रवादीला एक अशी बरोबरी झाली. आठमध्ये विजय मिळवत शिवसेनेने ९-७ अशी आघाडी घेतली. नऊ व १० हे आमदार दिलीप सोपल यांचे बालेकिल्ले मानले जातात. अपेक्षेप्रमाणे येथे पुन्हा यश मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने ९-११ अशी आघाडी घेतली. एक ते १० मध्ये त्यांना हक्काच्या काही जागा गमावाव्या लागल्या. ११ पासून शिवसेनेने मुसंडी मारली. प्रभाग २० पर्यंत एकाही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. अखेर २९-११ अशा फरकाने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली. थेट नगराध्यक्षपदाच्या लढतीत कमालीची चुरस दिसली. प्रभाग १० अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत कथले ११९० मतांनी पुढे होते. १५ अखेर १९ मतांनी ते पुढे होते. मात्र, १६ पासून शिवसेनेचे अॅड. असिफ तांबोळी यांनी निर्णायक आघाडी घेण्यास सुरुवात केली. प्रभाग २० पर्यंत मतांची आघाडी वाढतच जाऊन अखेर तांबोळी २४६८ मतांनी विजयी झाले. त्यांना २८१५२ मते मिळाली. कथले यांना २५६८४ मते मिळाली. भाजपचे अॅड. वासुदेव ढगे यांना ५४२६ मते मिळाली.

पक्ष, प्रभागनिहाय विजयी उमेदवार व कंसात प्रतिस्पर्धींवर मिळवलेली मतांची आघाडी : शिवसेना : चार अ : अमोल चव्हाण (५७४), ब : राजश्री शिंदे (२९४ ), पाच अ : राहुल कांबळे (२१६२), ब : विद्या पवार (२०९४), सहा अ : शबाना तांबोळी (११६), ब : रोहित लाकाळ (११०), सात अ : सतीश जाधव (११४), आठ अ : पाचू उघडे (५३३), ब : धृपदा चव्हाण (४८०), ११ अ : रजिया बागवान (२४२), ब : महेश जगताप (१५१), १२ अ : भागिरथी त्रिंबके (६४३), ब : संतोष बारंगुळे (५३६), १३ अ : शहेनाज मुल्ला (१११), ब : कय्युम पटेल (४६९), १४ अ : शोभा मोरे (१८९), १४ ब : शरद फुरडे (१४३) १५ अ : मनीषा पोफळे (६७१), ब : मदन गव्हाणे (४३६), १६ अ : सोनल होनमाने (५५५), ब : विजय चव्हाण (५२२), १७ अ : अमोल वायकुळे (७०४), १७ ब : पुष्पा वाघमारे (५६४), १८ अ : नागेश दुधाळ (९८५), ब : योजना पवार (५६९), १९ अ : आशा लोंढे (६३८), ब : दीपक राऊत (७३०), २० अ : कुसूम सुर्वे (५३७), ब : कृष्णराज बारबोले (७१४).

राष्ट्रवादी काँग्रेस : एक अ : पृथ्वीराज रजपूत (११५), ब : कल्पना गायकवाड (१७८), दोन अ : ज्योतिर्लिंग कुंभार (८०), ब : संगीता लांडे (१०७) तीन अ : वर्षा रसाळ (४१४), ब : त्रिंबक वाणी (२९३), ब : सुनीता माने (१४५), नऊ अ : शीतल वाघमारे (५५१), ब : नागेश अक्कलकोटे (५९२), १० अ : राजश्री माळगे (८४६), १० ब : विलास रेणके (४२९).

चार विद्यमान नगरसेवक विजयी, चार पराभूत
विद्यमान नगरसेवक देविदास शेटे, रिजवाना शेख, माजी उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, महेदिमियाँ लांडगे यांचा पराभव झाला तर दीपक राऊत, अमोल चव्हाण, पाचू उघडे हे पुन्हा निवडून आले. दहा वर्षे स्वीकृत नगरसेवक असलेले नागेश अक्कलकोटे पहिल्यांदाच जनतेतून निवडणूक लढवून विजयी झाले.

बारबोलेंच्या तिसऱ्या पिढीचे यशस्वी पदार्पण
अण्णासाहेब बारबोले यांच्यानंतर माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, पालिकेतील विरोधी पक्षनेते अरुण बारबोले ही दुसरी पिढी बार्शीच्या राजकारणात सक्रिय होती. विश्वास बारबोले यांचे पुत्र कृष्णराज बारबोले हे नगरसेवकपदी निवडून आले आहेत. त्यांच्या रूपाने बारबोलेंच्या तिसऱ्या पिढीचे राजकारणात यशस्वी पदार्पण झाले.

नातेवाइकांना दिला पराभवाचा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांगडे यांचे पुतणे सचिन मांगडे, नगराध्यक्षा मंगल शेळवणे यांचे पुत्र सुजित शेळवणे, माजी उपनगराध्यक्ष आबा पवार यांच्या पत्नी मीना पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. २००१ मध्ये शिवसेनेकडून थेट जनतेतून नगराध्यक्ष झालेले कै. श्रीकांत पिसे यांचे पुत्र अमोल पिसे यांचा नागेश अक्कलकोटे यांनी पराभव केला.
बातम्या आणखी आहेत...